नवी दिल्ली :तिहार तुरुंगात असलेल्या ठग सुकेश चंद्रशेखरसंदर्भात एक बातमी समोर येत आहे. सुकेश चंद्रशेखरनं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना एक पत्र लिहिलं असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्या कथित पत्रानुसार सुकेश चंद्रशेखरनं त्याची विदेशातील कमाई 22410 कोटी असल्याचं म्हटलंय. त्या कमाईवरील 7640 कोटींचा कर द्यायचा असल्याचं त्यानं म्हटलंय. विदेशातील त्याच्या दोन कंपन्यांमधून 2024-25 या आर्थिक वर्षात 22410 कोटी रुपयांची कमाई केल्याचं सुकेश चंद्रशेखरनं म्हटलंय.
कोणत्या कंपन्यांतून सुकेशची कमाई
सुकेशनं दावा केल्यानुसार त्याच्या विदेशात दोन कंपन्या आहेत. LS होल्डिंग्ज इंटरनॅशनल (नेवाडा,अमेरिका) आणि स्पीड गेमिंग कॉर्पोरेशन (ब्रिटीश वर्जि आयलँडस) या 2016 पासून सुरु आहेत. या दोन्ही कंपन्या ऑनलाईन आणि ऑफलाईन गेमिंग आणि बेटिंग क्षेत्रात काम करतात. सुकेशनं म्हटलं की या कंपन्यांचा कारभार अमेरिका, स्पेन, ब्रिटन, दुबई, हाँगकाँग सारख्या अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. 2024 मध्ये कंपन्यांनी 22410 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
भारतात गुंतवणुकीची इच्छा?
न्यूज 18 च्या एका रिपोर्टनुसार सुकेश चंद्रशेखरनं त्याच्या पत्रात म्हटलं की त्याला उत्पन्नावर कर देण्यासोबत भारतात तंत्रज्ञान आणि ऑनलाईन स्किल गेमिंग क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे. विदेशातील कमाई पूर्णपणे कायदेशीर असल्याचा आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग कायद्यांचं पालन करुन केलेली असल्याचा दावा त्यानं केला आहे.
सुकेश चंद्रशेखरवर कोणते आरोप?
सुकेश चंद्रशेखरवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचे आणि मनी लाँड्रिंगचे गंभीर आरोप आहेत. 200 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात तो आहे. रॅनबॅक्सीचे माजी प्रमोटर्स शिविंदर सिंह आणि मलविंदर सिंह यांच्या पत्नींची 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात तो अडकला आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि इतर यंत्रणांच्या कडून देखील त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून ती प्रकरण देखील सुरु आहेत. सुकेश चंद्रशेखरवर श्रीमंतांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सुकेश चंद्रशेखरचं नाव बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सोबत देखील चर्चेत यायचं.
(एबीपी माझा ठग सुकेश चंद्रशेखरनं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना लिहिलेल्या पत्राची पुष्टी करत नाही)
इतर बातम्या :