Success Story: आपल्या देशात शून्यातून मोठं विश्व निर्माण करणारे अनेक व्यवसायिक आहेत. अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आज आपण रवींद्र किशोर सिन्हा म्हणजेच आर के सिन्हा यांची यशोगाथा पाहणार आहोत. फक्त 250 रुपयांमध्ये 2 खोल्यांमध्ये त्यांनी एका कंपनीची सुरुवात केली होती. आज ते 12000 कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत. जाणून घेऊयात त्यांची यशोगाथा. 


तुम्ही ऑफिस किंवा मॉलच्या बाहेर निळ्या रंगाचा ड्रेस घातलेला सुरक्षा रक्षक पाहिला आहे का? हे सुरक्षा रक्षक रवींद्र किशोर सिन्हा यांनी सुरू केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या खासगी सुरक्षा प्रदाता कंपनी सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (SIS) चे कर्मचारी आहेत. त्यांनी ही कंपनी दोन खोल्यांमध्ये सुरु केली होती. पण आज त्या कंपनीची उलाढाल ही 12000 कोटींहून अधिक आहे. आरके सिन्हा यांनी 1974 मध्ये पाटणा येथे या कंपनीची सुरुवात केली होती. आज त्यांची कंपनी भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये सेवा देत आहे. 


फोर्ब्सनुसार, आरके सिन्हा यांची सध्याची एकूण संपत्ती 8300 कोटी रुपये (1 अब्ज डॉलर) आहे. 36,000 हून अधिक कायम कर्मचारी आणि 3000 कॉर्पोरेट ग्राहकांसह एसआयएस कंपन्यांना आशिया पॅसिफिक क्षेत्रातील मनुष्यबळ सुरक्षा व्यवसायातील नेते म्हणून ओळखले जाते.


कंपनीला ऑस्ट्रेलियातून अधिक महसूल 


RK सिन्हा यांच्या SIS ला ऑस्ट्रेलियातून सर्वाधिक महसूल मिळतो. SIS ने कॅश लॉजिस्टिक सेवा प्रदान करण्यासाठी स्पेनच्या Prosegur सह संयुक्त उपक्रम सुरू केला आहे. आरके सिन्हा हे केवळ एक यशस्वी उद्योगपती नाहीत तर ते राजकारणी देखील आहेत. सिन्हा हे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत आणि ते राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत.


पत्रकार म्हणूनही त्यांनी केलं काम 


पाटण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आरके सिन्हा यांनी 1971 मध्ये राज्यशास्त्रात पदवी मिळवली. कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी एका प्रकाशनात पत्रकार आणि प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. त्याच दरम्यान भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाले. यादरम्यान त्यांची बिहार रेजिमेंटच्या सैनिकांशी मैत्री झाली. युद्ध संपल्यानंतर ते 1973 मध्ये जेपी चळवळीत सामील झाले. त्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.


नोकरी गमावल्यानंत सुरु केली कंपनी 


नोकरी गमावल्यानंतर, दोन महिने आर्थिकदृष्ट्या टिकून राहण्यासाठी त्यांना फक्त 250 रुपये पगार होता. जो प्रकाशन कंपनीने दिला होता. पुढे काय करावं याचा विचारच त्यांना होत नव्हता. त्यादरम्यान त्यांना बांधकाम व्यवसाय असलेल्या त्यांच्या एका मित्राची भेट झाली. प्रकल्पस्थळाच्या सुरक्षेसाठी माजी सैनिक शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. सिन्हा यांनी युद्धादरम्यान बिहार रेजिमेंटच्या सैनिकांशी असलेल्या मैत्रीबद्दल सांगितले. तेव्हा त्या मित्राने त्यांना सुरक्षा कंपनी स्थापन करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आरके सिन्हा यांनी माजी सैनिकांशी संपर्क साधला. त्यापैकी अनेक जण निवृत्तीनंतर कामाच्या शोधात होते. फेब्रुवारी 1974 मध्ये पाटणा येथे दोन खोल्यांमध्ये SIS ची स्थापना करण्यात आली. त्यांनी बिहार रेजिमेंटमधील त्यांच्या संपर्कांना भेटून सेवानिवृत्त जवानांची माहिती घेतली आणि त्यांना काम करण्यास पटवून दिले. SIS ची स्थापना झाल्यानंतर एका वर्षात कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 250-300 पर्यंत वाढली आणि उलाढाल 1 लाख रुपयांच्या पुढे गेली.


कंपनीचा महसूल 12000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे


गेल्या वर्षी आरके सिन्हा यांनी सांगितले होते की त्यांच्या कंपनीत 284000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. आर्थिक वर्ष 2024 मध्ये SIS समूहाचा कंपनीचा महसूल (FY24 मध्ये SIS महसूल) रु. 12261 कोटींवर पोहोचला आहे आणि Ebitda रु. 585 कोटी झाला आहे.