Sugar Inflation:  महागाईने हैराण असलेल्या नागरिकांना आणखी धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यात गोड साखरेला महागाईची कडवट चव येण्याची शक्यता आहे. साखरेचे उत्पादन घटणार असल्याने तसा अंदाज व्यक्त केला जात आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपेरिटव्ह शुगर फेडरेशनने (NFCSF) सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षातील 2022-23 मध्ये साखर उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सप्टेंबर अखरेच्या तिमाहीपर्यंत 3.27 कोटी टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. याआधी 3.55 कोटी टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 


चालू हंगामात 2021-22 च्या तुलनेत साखरेचे उत्पादन 9 टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. 2021-22 मध्ये 3.59 कोटी टन साखरेचे उत्पादन झाले. NFCSF नुसार, देशभरातील सुमारे 531 साखर कारखान्यांनी 30 एप्रिलपर्यंत 32.03 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन केले आहे. 531 साखर कारखान्यांपैकी 67 कारखाने अद्याप सुरू आहेत. एनएफसीएसएफचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की, सध्याचा गाळपाचा वेग पाहता देशातील साखरेचा हंगाम मे अखेरपर्यंत सुरू राहणार असून सुमारे 32.7 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे.


त्यांनी पुढे म्हटले की, त्याशिवाय, इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे 45 लाख टन साखरेची मळी वापरला जाण्याचा अंदाज आहे. उसाच्या रसापासुन साखर बनवितांना मळी (मोलॅसिस) तयार होते. त्या मळीवर प्रक्रिया करून इथेनॉल तयार होते. एनएफसीएसएफने सांगितले की, त्याचा अंदाज ऊस आणि साखर उत्पादनावर नुकत्याच हाती असलेल्या माहितीवर आधारित आहे.


साखरेचे उत्पादन कमी झाल्याचा परिणाम त्याच्या दरावरही दिसून येत आहे. गेल्या महिनाभरात साखरेच्या दरात 1.50 रुपयांची वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी 41 रुपये किलोने मिळणारी साखर आता 42.50 रुपये किलोने उपलब्ध आहे. घाऊक बाजारातही साखरेच्या दरात वाढ झाली आहे.


साखरेचा दर वाढल्याने बिस्कीटापासून चॉकलेट, सॉफ्ट ड्रिंक, मिठाई आदीसारख्या पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, सामान्यांचे बजेटही बिघडण्याची शक्यता आहे. 


महाराष्ट्र हे साखर उत्पादनाचे मोठे राज्य आहे. मात्र येथे साखरेचे उत्पादन घटले आहे. मागील महिन्यात समोर आलेल्या वृत्तानुसार, गेल्या हंगामात महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन 12.65 दशलक्ष टन होते, ते यंदा 10.5 दशलक्ष टनांवर आले आहे. त्याचवेळी कर्नाटकातील साखरेचे उत्पादन 58 लाख टनांवरून 55.3 लाख टनांवर आले आहे. उत्तर प्रदेश हे महाराष्ट्रानंतर साखर उत्पादनात दुसरं मोठं राज्य आहे. उत्तर प्रदेशात साखरेचे उत्पादन काही प्रमाणात वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे केंद्र सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.