Success Story : अलिकडच्या काळात अनेक शेतकरी आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करताना दिसत आहे. शेतीबरोबरच जोडव्यवसाय देखील करत आहे. यामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं महिला देखील काम करताना दिसत आहेत. आज आपण अशाच एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील गोंडोली गावात राहणाऱ्या सुवर्णा भगवान पाटील (Suvarna Bhagwan Patil) यांची यशोगाथा आहे. गांडूळ खताच्या निर्मितीद्वारे त्यांनी प्रगतीचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या आणि कालांतराने एका शेतकऱ्यासोबत विवाह झालेल्या सुवर्णा भगवान पाटील या रुढीवादी शेतकरी म्हणून समाधानी नव्हत्या. त्यांची नेहमी आणखी काहीतरी करण्याची इच्छा होती. कोल्हापूर जिल्ह्यातील गोंडोली गावात 2.5 एकर जमिनीच्या मालक असलेल्या सुवर्णा या पारंपारिक कृषी पद्धतींऐवजी नाविन्यपूर्ण कृषी पद्धतींचा शोध घेत होत्या. तसेच त्या आपल्या चार सदस्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न देखील करत होत्या. ऊस हे दीर्घकालीन (12 ते 14 महिने) पीक आहे.
तज्ञांकडून घेतलं गांडूळखतासह पुनरुत्पादक कृषी पद्धतीचं मार्गदर्शन
हवामान बदलामुळं हवामानातील अनियमितता पाहता सुवर्णा यांच्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना एका पिकाच्या उत्पन्नावर कुटुंब चालवणे, तसेच शाश्वतपणे शेती करणं हे दिवसेंदिवस कठीण होत चाललं होतं. 43 वर्षांच्या सुवर्णा कोका कोला फाऊंडेशनच्या पाठिंब्यानं सॉलिडरिदाद आणि दालमिया भारत शुगर इंडस्ट्रीज लि. (डीबीएसआयएल) यांनी संयुक्तपणे राबवलेल्या उन्नती मीठा सोना अंतर्गत त्यांच्या गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या माती आरोग्य सुधारणा प्रशिक्षणामध्ये त्या सामील झाल्या होत्या. यावेळी त्यांना आशेचा किरण दिसला. सुवर्णा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील दालमिया भारत शुगर निनाईदेवीला ऊस पुरवठा करतात. अधिक माहिती जाणून घेण्याच्या उत्सुकतेसह त्यांनी गावातील फार्मर फील्ड स्कूलला (शेतकरी क्षेत्र शाळा) भेट दिली, जेथे त्यांना तज्ञांकडून भाषणादरम्यान गांडूळखतासह पुनरूत्पादक कृषी पद्धती आणि जमिनीला, तसेच शेतकऱ्यांना होणारे त्यांचे फायदे याबाबत मार्गदर्शन मिळाले.
जमिनीचे आरोग्य हे माणसाच्या आरोग्याइतकेच महत्त्वाचे
सुवर्णा यांना समजले की, त्यांच्या ऊसाच्या शेतात जास्त प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत आहे आणि गांडूळखत हे जैव खत पर्यावरणास अनुकूल आणि किफायतशीर पर्याय आहे. त्यांनी 2022 मध्ये या उपक्रमात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि येथून त्यांच्या प्रगतीशील शेतकरी-उद्योजक बनण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. सुवर्णा म्हणाल्या माझे भूमातेवर प्रेम आहे. आपल्याला जमिनीमधून अन्न मिळते या एकमेव कारणामुळं मी जमिनीची पूजा करते. जमिनीचे आरोग्य हे माणसाच्या आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे. प्रशिक्षण उपक्रमामध्ये मला कळले की, गांडूळखत वापरल्याने जमिनीची सुपीकता वाढते आणि मी गांडूळ व कंपोस्ट विकून पैसेही कमवू शकते. तेव्हा मी माझे स्वतःचे गांडूळखत युनिट उभारायचे ठरवले.
गांडूळ खताचा नियमित वापर केल्यास जमिनीतील सुपीकता वाढते
गांडूळखत हा कचरा म्हणजेच अन्नाचे तुकडे, वनस्पती साहित्य आणि पशुधनाचा कचरा (गुरांचे शेण) - मातीसाठी आवश्यक पोषक घटकांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रसिद्ध मार्ग आहे. गांडूळे जमिनीत राहून आणि गांडूळखताद्वारे सेंद्रिय पदार्थांचे कृमीत रूपांतर करून या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. या गांडूळामुळे जमिनीची सुपीकता वाढते, तसेच जमिनीचे आरोग्य सुधारते. त्यात उपलब्ध नायट्रोजनच्या पाचपट जास्त, पोटॅशच्या सात पट जास्त आणि नियमित वरच्या मातीत आढळणाऱ्या प्रमाणाच्या दीडपट जास्त कॅल्शियम असते. ठराविक कालावधीत गांडूळ खताचा नियमित वापर केल्यास जमिनीतील सुपीकता वाढू शकते आणि रासायनिक खतांची गरजही कमी होते, ज्यामुळे सुवर्णासारख्या अल्पभूधारकांची अधिक बचत होऊ शकते.
एका बेडच्या माध्यमातून त्या 450 किलो गांडूळखत
या उपक्रमांतर्गत सुवर्णा यांना वर्मीकंपोस्ट बेड (किंवा वर्मी-बेड) मिळाले, तसेच तज्ञ प्रशिक्षक आणि फील्ड कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या शेताच्या जवळ ते स्थापित करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले. फील्ड टीमने नियमितपणे त्यांच्या शेताला भेट देत कंपोस्टचे निरीक्षण केले आणि त्यांना बेडच्या देखरेखीबाबत सल्ला देखील दिला. पाच महिन्यात सुवर्णा यांना बदल दिसून आला. एका बेडच्या माध्यमातून त्या 450 किलो गांडूळखत बनवू शकल्या. त्यांनी ऊस पिकासाठी या गांडूळखताचा वापर केला. तसेच फिल्ड टीमच्या सहकार्यासह त्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या बाजूस असलेल्या अंगणामध्ये परसबाग विकसित केली. त्या बागेमध्ये भाजीपाला, वांगी व भेंडीचे उत्पादन करतात आणि आपल्या चार जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
आत्तापर्यंत 3200 किलोपेक्षा जास्त गांडूळखत तयार
सुवर्णा पाटील यांनी या उपक्रमाची अंमलबजावणी करून अजून एक वर्ष देखील झालेले नाही. त्या दोन वर्मी-बेड्सच्या माध्यमातून 3200 किलोपेक्षा जास्त गांडूळखत तयार करण्यामध्ये यशस्वी ठरल्या आहेत. त्यांनी अतिरिक्त गांडूळखत त्यांच्या गावातील इतर शेतकऱ्यांना विकून रुपये कमावले. हे उत्पन्न त्यांच्या ऊस पिकातून आणि स्थानिक दूध संकलन केंद्रावर विकणाऱ्या म्हशीच्या दूधातून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त आहे. 5000 किलो गुरांचे शेण गांडूळखत तयार करण्यासाठी वापरले गेले. गांडूळ खताचा नियमित वापर केल्यानं त्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी केला आहे. या हंगामात त्यांची 8500 रुपयांची बचत झाली आहे. गांडूळ खतामुळं मला पैसे वाचवायला मदत होते, असेही त्या यावेळी म्हणाल्या. मी आता पिकांसाठी गांडूळखतासह फक्त शिफारस केलेल्या रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर करते असे पाटील म्हणाल्या.
गांडूळ खताचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न
सुवर्णा यांचा गांडूळ खताचा व्यवसाय वाढवण्याचा मनसुबा आहे. मी माझ्या अतिरिक्त उत्पन्नामधून काही उत्पन्न त्या सिव्हिल सर्विसेस परीक्षांसाठी तयारी करत असलेल्या त्यांच्या मुलाला देण्यासाठी देखील बचत केलेल्या उत्पन्नाचा वापर करत आहे. प्रत्यक्ष परिवर्तन पाहिले तरच विश्वास बसतो. सुवर्णा आता त्यांच्या समुदायामधील प्रमुख आदर्श व्यक्ती आहेत. इतरांना गांडूळ खत वापराबाबतचा स्वत:चा अनुभव सांगत आहेत.
प्रशिक्षण देणाऱ्यांचे आभार
'मी वर्मी-बेडसह मला साह्य करणाऱ्यांचे तसेच गांडूळखत कसे तयार करावे याबाबत प्रशिक्षण देणाऱ्यांचे आभार मानत असल्याचे पाटील म्हणाल्या. मी आता माझ्या गावातील इतर महिला शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये वर्मी-बेड स्थापित करण्यास प्रेरित करत आहे. ज्यामुळं त्या देखील अतिरिक्त उत्पन्न कमावू शकतील आणि भूमातेचे संरक्षण करू शकतील. अशीच एक महिला शेतकरी आहे. त्यांचे नाव वनिता आहे. त्या 36 वर्षीय आहेत. तिने आपल्या 1.5 एकर ऊसाच्या शेतात वर्मी-बेड स्थापित केले आहे. नियमितपणे पुनरुत्पादक कृषी पद्धतींवरील प्रशिक्षण सत्रांमध्ये उपस्थित राहते. 'मला या सत्रांमधून मिळालेल्या माहितीमधून गांडूळखत पिकांचे, तसेच मातीचे आरोग्य सुधारण्यास कशाप्रकारे मदत करू शकते हे समजले.
उन्नती मीठा सोना उपक्रम शेतकऱ्यांची कृषी उत्पादकता व उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा, सानुकूल सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचे जतन करण्याचा, संसाधनांच्या कार्यक्षम वापराला चालना देण्याचा, पुनरूत्पादक पद्धतींच्या माध्यमातून जमिनीचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करते. तसेच शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी पोषण आणि संतुलित आहार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो.
महत्त्वाच्या बातम्या: