success story : अलिकडच्या काळात अनेकजण शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत आहेत. या माध्यमातून मोठा नफा देखील कमावत आहेत. आज आपण अशाट एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत, ज्या शेतकऱ्यांने भाजीपाला पिकातून कोट्यावधी रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे. ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यातील गोलमुंडा ब्लॉकमधील कृष्णचंद्र नाग असं या शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात कृष्णचंद्र यांचे कौतुक केले.
आधुनिक कृषी तंत्र वापरण्यासाठी ओळखले जाणारे, कृष्ण चंद्र 16 एकर जमिनीवर टोमॅटो आणि इतर भाजीपाला पिकवतात. त्यातून वार्षिक 1.5 कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यांना निव्वळ 75 ते 80 लाख रुपयांचा नफा होतो. त्यांच्या शेतीच्या या नव्या प्रयोगामुळे त्यांच्या स्वतःच्या जीवनमानात तर बदल झाला आहेच, शिवाय परिसरातील 100 हून अधिक शेतकऱ्यांना रोजगाराची संधीही मिळाली आहे.
पंतप्रधान मोदींनी केलं शेतकऱ्याचं कौतुक,
मन की बात या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदींनी कृष्णचंद्र या शेतकऱ्याचं कौतुक केलं आहे. FPO ने एक शाश्वत आणि फायदेशीर व्यवसाय मॉडेल तयार केले आहे, जे स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देते आणि कृषी क्षेत्रातील इतरांना प्रेरणा देते असे पंतप्रधान म्हणाले. कृष्णचंद्र यांनी सहकारी शेतकऱ्यांना शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करून चांगले उत्पादन आणि नफा मिळविण्यासाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे प्रयत्न हे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक मोठी प्रेरणा ठरु शकतात असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
वार्षिक उलाढाल 1.5 कोटी रुपये
शेतकरी कृष्णचंद्र म्हणाले, मी 16 एकरमध्ये भाजीपाला शेती करतो. मी केवळ माझ्या जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांची उत्पादकता आणि विकासासाठी काम करत आहे. भविष्यात शेतकऱ्यांना करोडपती बनवण्याचा माझा निर्धार असल्याचे कृष्णचंद्र म्हणाले. कृष्णचंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2006 पासून मी शेती करत आहे. सध्या 16 एकर जमिनीवर पिके घेतो. ज्याची वार्षिक उलाढाल 1.5 कोटी रुपये आहे. तर निव्वळ नफा हा सुमारे 75 ते 80 लाख रुपये आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या गावाला भाज्यांचे हब म्हटल्याने त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानलेत. नाबार्ड आणि महाशक्ती फाउंडेशन आधुनिक शेती पद्धतीसाठी मोठी मदत करतात आणि अनुदानही देतात असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: