Santosh Deshmukh Murder case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन (Santosh Deshmukh Murder case) राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ शिक्षा करा, या मागणीसाठी बीड जिल्ह्यानंतर धाराशिवनंतर आज बुलढाण्यात (Buldhana) मोर्चा काढण्यात आला. आरोपींना तात्काळ अटक करा, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा, या मागण्यासाठी आज बुलढाण्यातील सिंदखेड राजा इथे मराठा समाज बांधवांकडून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान राजवाडा ते तहसील कार्यालय असा मोठा मोर्चा काढण्यात आला.  

Continues below advertisement


मराठा बांधवांच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन


बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ पकडा. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा, अशा मागण्या घेऊन आज बुलढाण्यातील सिंदखेड राजा इथं मराठा समाज बांधवांकडून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान राजवाडा ते तहसील कार्यालय असा मोठा मोर्चा काढण्यात आला. राजवाड्यासमोर झालेल्या सभेत संतोष देशमुख यांच्या कन्या व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी आम्हाला न्याय देण्यासाठी समाजाने आमच्या पाठीशी उभे राहावे, अशी विनंती उपस्थितांना केली. यावेळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व समाजातील अनेक प्रतिष्ठितांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर राजवाडा ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता झाली. या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला देखील उपस्थित होत्या.


बीड जिल्ह्यातील मोर्चानंतर राज्याच्या विवीिध भागात मोर्चे सुरु


बीड जिल्ह्यात 28 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी सर्वच नेत्यांनी केली. त्यासह, वाल्मिक कराडच या घटनेतील मुख्य सुत्रधार असून त्यालाही अटक करण्याची मागणी आमदार, खासदार व स्थानिक नेत्यांनी केली. तसेच, मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिल्यास मी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारेन, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्‍यांना इशारा दिला होता. तर, धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जात असल्याचंही नेत्यांनी म्हटलं होतं. अखेर, सीआयडीच्या तपासाचा वेग, पोलिस यंत्रणा व सरकावर वाढत असलेला राजकीय, सामाजिक दबाव लक्षात घेत आता वाल्मिक कराड शरण येत असल्याची माहिती आहे. 


महत्वाच्या बातम्या: