SEBI : सोशल मीडियावरून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना टिप्स देणाऱ्यांविरोधात सेबीने मोठी कारवाई केली आहे. सेबीने राबवलेल्या मोहिमेत वेगवेगळ्या शहरातून सात व्यक्ती आणि एका कंपनीच्या ठिकाणावर छापा मारला. या ठिकाणांवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी स्टॉक टिप्स देत असे. 


मागील काही वर्षात सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणुकीचे सल्ले देणाऱ्या कंपन्यांचे, कथित शेअर मार्केट सल्लागारांचे पेव फुटले होते. या कंपन्यांची, सल्लागारांची सेबीकडे नोंदणी नव्हती. याची दखल सेबीने घेतली. सेबीने गुजरातमधील अहमदाबाद, भावनगर, मध्य प्रदेशमधील नीमछ, दिल्ली आणि मुंबईत छापे मारले. सेबीने दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यात काही डॉक्युमेंट्स आणि रेकोर्डस जप्त केले आहेत. त्याशिवाय लॅपटॉप, मोबाइल फोन्स, डेस्कटॉप, टॅबलेट्स, हार्डड्राइव्ह, पेनड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे. याचा वापर करून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना टिप्स दिल्या जात होत्या. सेबी या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहे. 


सेबीला छाप्यात 9 टेलिग्राम चॅनेल्सच्या माध्यमातून टिप्स दिल्या जात असल्याचे आढळले आहे. यामध्ये एकूण जवळपास 50 लाखांहून अधिक सब्सक्राइबर आहेत. टेलिग्रामच्या माध्यमातून शेअर बाजारातील गुंतवणूकीच्या टिप्स दिल्या जात होत्या. या टिप्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास उकसवण्यात येत होते. जेणेकरून कृत्रिमरीत्या शेअरच्या किमती आणि व्हॉल्यूममध्ये वाढ करता येईल. त्यानंतर या कंपन्या नफा कमवून वधारलेल्या दरावर शेअर्सची विक्री करत होते. याचा फटका लहान गुंतवणूकदारांना बसत होता. 


सेबीचे आवाहन


सेबीने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे आणि टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे मिळणाऱ्या टिप्सचा वापर करून गुंतवणूक करू नये असे आवाहन सेबीने केली आहे. 


निवडक कंपन्यांच्या संदर्भात अशा स्टॉक टिप्स आणि शिफारसी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मोठ्या प्रमाणावर प्रसारित केल्या जात असल्याचे कळल्यानंतर सेबीने तपास सुरू केला.