Share Market Latest Update : शेअर बाजारासाठी (Share Market Update) आजचा दिवस हा काळा दिवस ठरला असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये तब्बल 1053 अंकांची घसरण झाली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 330 अंकांची घसरण झाली आहे. फार्मा क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा अमेरिकन शेअर्सकडे कल वाढल्याने जगभरातील अनेक शेअर बाजारांना त्याचा फटका बसल्याचं चित्र आहे. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 8 लाख कोटी रूपयाहून अधिक नुकसान झालं. 


शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली असून बाजार बंद होताना त्यामध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. सेन्सेक्समध्ये 1.47 टक्क्यांची घसरण होऊन तो 70,370 अंकावर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 1.53 टक्क्यांची घसरण होऊन तो 21,241 अंकांवर पोहोचला. तर बँक निफ्टीमध्येही 2.28 टक्क्यांची घसरण होऊन तो 45,006 अंकांवर पोहोचला. 


बँकांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण 


आज इंडसइंड बँक, कोल इंडिया, एसबीआय इन्शुरन्स, बीपीसीएल आणि एचयूएल यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही घसरण झाल्याचं दिसून आलं. 


शेअर बाजार घसरण्यामागे तीन प्रमुख कारणं सांगण्यात येत आहेत. एक तर HDFC सह अनेक बँकांचे शेअर घसरले आहेत. दुसरं मोठं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढले आहेत आणि तिसरं कारण म्हणजे अमेरिकन शेअर्समधून मिळणारा परतावा वाढला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार जगभरातील शेअर बाजारातून आपले पैसे काढून घेत अमेरिकेत गुंतवत आहेत. 


ही बातमी वाचा: