मुंबई : भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रामध्ये घसरण झाली असून परिणामी गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये  (Sensex) 953 अंकांची घसरण झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 311 अंकांची घसरण झाली. गेल्या चार दिवसांचा विचार करता गुंतवणूकदारांना 14 लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागलं आहे. 


बीएसईतील ऑटो, उर्जा, रिअॅलिटी, मेटल आणि ऑईल अॅन्ड गॅस या इंडेक्समध्ये 3 ते 4 टक्क्यांची घसरण झाली आहे. बँक कॅपिटल आणि एफएमसीजी इंडेक्समध्ये प्रत्येकी दोन टक्क्यांची घसरण झाली. 


भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस ब्लॅक मंडे ठरला असून त्यासाठी चार प्रमुख कारणं असल्याचं सांगितलं जातंय. ती कारणं खालीलप्रमाणे, 


अमेरिकन बाजारात घसरण  


अमेरिकेच्या शेअर बाजारात सप्टेंबर महिन्यात तिसऱ्यांदा आर्थिक घडामोडींमध्ये मंदी आल्याचं चित्र आहे. अमेरिकेसह युरोपमधील महत्त्वाच्या बाजारांमध्ये काहीशी शिथिलता आल्याचं दिसून येतंय. अमेरिकन मार्केट बेअरिश झोनमध्ये गेल्याचं अर्थतज्ज्ञांचं मत आहे. शुक्रवारी डावो जोन्समध्ये 2.35 टक्क्यांची घसरण झाली होती. तसचे एस अॅन्ड पी 500 मध्ये 2.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर नॅसडॅकमध्ये 2.55 टक्क्यांची घसरण झालेली आहे. 


डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण 


गेल्या काही दिवसांपासून रुपयाची किंमत चांगलीच घसरत आहे. आजही डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीमध्ये 63 पैशाची घसरण झाली असून रुपया 81.62 वर पोहोचला आहे. ही किंमत आतापर्यंत सर्वात निचांकी स्तरावर घसरली आहे. 


RBI व्याजदरात वाढ करण्याची शक्यता 


भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वेळी व्याजदरात वाढ केली होती. आताही आरबीआयकडून व्याजदरात वाढ होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, आरबीआय त्याच्या व्याजदरात 50 अंकांची वाढ करण्याची शक्यता आहे. येत्या शुक्रवारी आरबीआयची बैठक होणार असून त्यामध्ये व्याजदरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जगभरातील महत्त्वाच्या केंद्रीय बँकांच्या तुलनेत आरबीआयने त्याच्या व्याजदरात वाढ केली नाही. देशातील महागाईचा दर हा आरबीआयने निर्धारित केलेल्या 2 ते 6 टक्क्यांच्या वरती आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा एकदा रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे. 


अमेरिकेत व्याजदरात वाढ होण्याचे संकेत 


अमेरिकन केंद्रीय बँक असलेल्या फेडने त्याच्या व्याजदरात 75 अंकांची वाढ केली होती. अमेरिकेमध्ये महागाईचा दर अजूनही नियंत्रणाबाहेर असल्याने येत्या काळातही फेडकडून व्याजदरात वाढ करण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहेत. फेडचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांनी व्याजदरात वाढ होण्याचे संकेत दिलेले आहेत. जोपर्यंत महागाईचा दर नियंत्रणामध्ये येत नाही तोपर्यंत फेडकडून कडक धोरण अवलंबण्यात येणार आहेत. अमेरिकन फेडच्या व्याजदर वाढीचा परिणाम भारतासहित अनेक देशांना भोगावा लागणार आहे.