मुंबई : शेअर बाजारातील (Stock Market Updates) गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस ब्लॅक मंडे ठरला असून सेन्सेक्समध्ये (Sensex) 953 अंकांची घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रात घसरण झाली असून त्यामुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. गेल्या चार दिवसात गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत, तर गेल्या नऊ दिवसांचा विचार करता गुंतवणूकदारांचे 18 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेअर बाजारातील एकूण भांडवलामध्ये मोठी घट झाली आहे.


शेअर बाजारात (Share Market) सातत्याने असलेल्या विक्रीच्या दबावामुळे गेल्या नऊ दिवसात मुंबई शेअर बाजारातील संपत्तीत 18 लाख कोटी रुपयांची घट झालेली आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजारातील एकूण भांडवल 286.71 लाख कोटी रुपयावरून 269 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे. यापैकी गेल्या चार दिवसांमध्ये बहुतांश संपत्ती घट झाली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये 14 लाख कोटी रुपयांची संपत्ती कमी झालेली आहे. 


फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (FII) म्हणजे परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला असून एका आठवड्यात त्यांनी 4,362 कोटी रुपयांचे शेअर्स विक्री केले आहेत.  


अमेरिकेच्या फेडने त्याच्या व्याजदरात 75 अंकांची वाढ केल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर पडला आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी फेडने भविष्यात व्याजदात आणखी वाढ करण्याचे संकेत दिलेले आहेत. त्यानंतर बँक ऑफ इंग्लंडनेही त्याच्या व्याजदरात वाढ केले. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येत्या 30 तारखेला आपले निवेदन जारी करणार आहे. 


आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये  (Sensex) 953 अंकांची घसरण झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 311 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 1.64 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,145 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 1.79  टक्क्यांची घसरण होऊन तो 17,016 अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीमध्येही 930 अंकांची घसरण होऊन तो 38,616 अंकावर पोहोचला. डॉलरच्या तुलनेत रुपयाची निचांकी घसरण झाली आहे. आज रुपयाच्या किमतीत 63 पैशांची घसरण झाली. आज रुपयाची किंमत ही 81.62 इतकी झाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :