मुंबई :अलीकडच्या काळात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सुरुवातीला बँकेमध्ये मुदत ठेव ठेवणं हा गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचा पर्याय मानला जायचा. अजून देखील मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मुदत ठेव ही विश्वासार्ह गुंतवणूक मानली जाते. एलआयसीच्या गुंतवणुकीच्या योजना याशिवाय पोस्टामधील गुंतवणुकीच्या योजना देखील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या ठरतात. मात्र, या पर्यायांच्या तुलनेत म्युच्यूअल फंडमधील गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळत असल्याचं पाहायला मिळतं. निवृत्तीनंतर चांगली रक्कम आपल्याकडे असली पाहिजे या विचारानं नोकरी करणारे अनेक जण म्युच्यूअल फंडमध्ये एसआयपीद्वारे रक्कम गुंतवण्यास सुरुवात करतात. 10 हजार रुपयांची एसआयपी सुरु केल्यानंतर 1 कोटी रुपयांचा निधी जमा होण्यास किती वर्ष लागू शकतात हे पाहणार आहोत. 


अनेक जण एसआयपीचा पर्याय वापरुन म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतात. कोट्यधीश होण्याचं स्वप्न म्युच्यूअल फंडातील एसआयपीच्याद्वारे पूर्ण करता येऊ शकतं. यासाठी गुंतवणूक करताना धैर्य राखणं आवश्यक असतं. म्युच्यूअल फंडमध्ये एसआयपीद्वारे ठराविक रक्कम गुंतवता येते. त्यावर मार्केटच्या स्थितीनुसार रिर्टन मिळतात. हे रिटर्न 10 टक्के ते 15 टक्क्यांच्या दरम्यान असू शकतात किंवा त्यापेक्षा अधिक देखील असू शकतात. 


10-15-18 फॉर्म्युला नेमका काय? 


तुम्ही देखील म्युच्यूअल फंडमधील गुंतवणुकीद्वारे साधारण एक कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा प्रयत्न करत असाल नियोजन असणं आवश्यक आहे. तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवत गुंतवणूक करणं आवश्यक आहे. 10-15-18 च्या फॉर्म्युल्याच्या मदतीनं  1 कोटी रुपयांचा टप्पा गाठू शकता. 10 म्हणजेच 10000 हजार रुपये, 15 म्हणजे 15 टक्के सीएजीआर आणि 18 म्हणजे 18 वर्ष नियमित गुंतवणूक केल्यास 1 कोटी रुपयांचा टप्पा गाठता येऊ शकतो. 


10 हजार रुपयांची एसआयपी सुरु केल्यानंतर पुढची 18 वर्ष नियमितपणे दरमहा गुंतवणूक करावी लागेल. सीएजीआर 15 टक्के पकडल्यास 1 कोटी 10 लाख 42 हजार 553 रुपयांचा निधी जमा होऊ शकतो. यामध्ये तुमची गुंतवणूक 21 लाख 60 हजार रुपये असेल. तर, त्यावर परतावा 88 लाख 82 हजार 553 रुपये मिळेल. 


स्टेपअप एसआयपीचं सूत्र काय?


समजा तुम्ही 10000 हजार रुपयांची एसआयपी केली. त्यानंतर प्रत्येक वर्षी 10 टक्क्यांनी स्टेपअप करत गेलात आणि 15 टक्के सीएजीआर पकडल्यास साधारण 15 वर्षात एक कोटींचा निधी जमा होऊ शकतो. यामध्ये गुंतवणूकदाराला 38 लाख 12 हजार 698 रुपयांची गुंतवणूक करता येईल.तर, परतावा 72 लाख 87 हजार 297 रुपये मिळतील. म्हणजेच 15 वर्ष पूर्ण होत असताना 1 कोटी 10 लाख 99 हजार 995 रुपयांचा निधी जमा झालेला असेल. 


इतर बातम्या :



(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)