Stock Market : देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) गेल्या 16 महिन्यांत निव्वळ खरेदीदार म्हणून उदयास आले आहेत. निव्वळ खरेदीदार म्हणजे त्यांनी विक्रीपेक्षा जास्त खरेदीच केली आहे. 2022 मध्ये आतापर्यंत त्यांनी भारतीय शेअर बाजारात 2 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. मनीकंट्रोलम या वेबसाईटने ही बातमी दिली आहे. एका कॅलेंडर वर्षात DII द्वारे केलेली ही सर्वाधिक गुंतवणूक आहे.


बाजारातील घसरणीचा फायदा देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार घेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे एफआयआय (फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स) ची विक्री आहे. DII निव्वळ खरेदीदार राहिले आहेत, तर  एफआयआय निव्वळ विक्रेते झाले आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या वर्षाचा केवळ अर्धाच कालावधी उलटला आहे, अशा परिस्थितीत डीआयआयकडून अधिक खरेदी दिसून आली.


शेअर बाजाराकडे वाढता कल


अलीकडच्या काळात लोकांचा कल भौतिक मालमत्तेकडून इक्विटी मार्केटकडे वळला आहे. डीमॅट खाती आणि गुंतवणूकदारांच्या संख्येत गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं वस्तुस्थिती सांगते असं रिलायन्स सिक्युरिटीजचे मितुल शाह यांचं म्हणणं आहे. गुंतवणूक आकर्षित करण्याच्या बाबतीत भारत इतर देशांपेक्षा चांगला आहे. अनेक गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन चीनमधून भारताकडे सरकला आहे आणि ब्रोकरेजच्या मते हा ट्रेंड भविष्यातही दिसून येईल.


बाजारात जास्त पैसे येतील


भारतातील घरगुती बचत दरवर्षी 53 लाख कोटी रुपये आहे. यापैकी इक्विटी बाजारातील हिस्सा सुमारे 2.52 लाख कोटी रुपये आहे जो एकूण बचतीच्या सुमारे 4.80 टक्के आहे. याशिवाय, EPFO दरवर्षी 25,000 ते 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक बाजारात करते. वृत्तानुसार, सरकार EPFO ची गुंतवणूक मर्यादा 15 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे आणि असे झाले तर आणखी पैसे बाजारात येताना दिसतील असं ब्रोकरेज हाऊस जेफरीजने म्हटले आहे 


एफआयआयची जोरदार विक्री


या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 3.87 लाख कोटी रुपये काढले आहेत. रशिया-युक्रेन युद्धापूर्वीही एफआयआयने विक्रीचा कल दाखवला होता. जूनमधील शेवटच्या व्यावसायिक आठवड्यापर्यंत एफआयआयने बाजारातून 14,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत. भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे.