Stock Market : भारतीय शेअर बाजारात  (Share Market) आज सलग दुसऱ्या दिवशी उसळी पाहायला मिळाली आहे.  जागतिक बाजारातील खरेदीमुळे अनेक दिवसानंतर देशांतर्गत शेअर बाजारात आज चांगली वाढ झाली. आजच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्स सुमारे 1300 अंकांनी वाढून  54 हजार 318 अंकांवर बंद झाला.  तर निफ्टी निर्देशांकाने आज  16200 चा टप्पा पार केला. निफ्टीमध्ये आज 417 अंकांची वाढ झाली.   


सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ
आजच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स 1344.63 अंकांच्या म्हणजे 2.54 टक्क्यांच्या वाढीसह 54,318.47 वर  बंद झाला. तर निफ्टी निर्देशांक 417.00 अंकांच्या म्हणजे 2.63 टक्क्यांच्या वाढीसह 16,259.30 वर  बंद झाला.


आज दिवसभरात झालेल्या व्यवहारात सेन्सेक्सच्या टॉप 30 शेअर्सची चांगली खरेदी झाली. आज सर्वच शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. आजचा टॉप गेनर स्टॉक टाटा स्टील आहे. टाटा स्टीलचा शेअर आज  7.6 टक्क्यांनी वाढला. तर रिलायन्सचा शेअर आज 4 टक्क्यांनी वधारला. 


या शेअरमध्ये वाढ


हिंदाल्को इंडस्ट्रीज, टाटा स्टील, कोल इंडिया, जेएसडब्लू स्टील आणि ओएनजीसी कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील आज वाढ झाली. परंतु, लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी आज एलआयसीकडून गुंतवणूकदारांची निराशा झाली. 949 इशू प्राइस असलेला एलआयसीचा शेअर 873 वर बंद झाला. त्यामुळे आज पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची निराशा झाली. 


आज क्षेत्रीय निर्देशांकात देखील वाढ झाली. निफ्टी बँक, ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेस, एफएमसीजी, निफ्टी आयटी, मीडिया, मेटल, फार्मा, पीएसयू बँक, प्रायव्हेट बँक, रियल्टी, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल आणि ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये चांगली खरेदी झाली. त्यामुळे आज सर्व क्षेत्रातील निर्देशांकात 1 ते 3 टक्क्यांची वाढ झाली, तर निफ्टी मेटलमध्ये सात टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. 


चीनमधील लॉकडाऊन उठण्याच्या शक्यतेमुळे आज मेटलमध्ये तेजी दिसून आली. चीन मेटलचा जगातील सर्वात मोठा खरेदीदार आहे. घाऊक महागाई दरात वाढ झाल्यानंतर देखील आज भारतीय शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली आहे.