Silicon Valley Bank : अमेरिकेतील महत्त्वाच्या बँकेपैकी एक असलेल्या सिलिकॉन व्हॅली बँकेने (Silicon Valley Bank) अखेर दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेला मागील आठवड्यात टाळं लावण्यात आले होते. त्यानंतर आज सिलिकॉन व्हॅली बँकेने दिवाळखोर जाहीर करण्यासाठी अर्ज केला आहे. बँकेने दिवाळखोरीतून सावरण्यासाठी मालमत्ता विक्री आणि अन्य पर्यायांवर विचार केला होता, असे वृत्त आहे. 


फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने जप्तीची कारवाई केल्यानंतर केल्यानंतर SVB फायनान्शियल ग्रुप आता सिलिकॉन व्हॅली बँकेशी संलग्न नाही. 


सिलिकॉन व्हॅली ब्रिज बँकेकडून सध्या सिलिकॉन व्हॅली बँकेचे व्यवहार FDIC च्या देखरेखीत आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेवरील संकट हे अमेरिकेतील 2008 मधील बँकिंग संकटानंतरचे दुसरे महत्त्वाचे संकट आहे. सिलिकॉन व्हॅली बँक ही अमेरिकेतील 16 व्या क्रमांकाची बँक आहे. अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील अनेक स्टार्टअपला बँकेने कर्ज पुरवठा केला. मात्र, महागाईमुळे सततचे वाढत जाणारे व्याजदर, आयटी क्षेत्रातील मंदी आदी कारणांने बँकेवर संकट ओढावले. 


बँकेची मालमत्ता सुमारे 210 अब्ज डॉलर्स इतकी आहे. ही देशातील आघाडीची बँक आहे जी नवीन-युगातील तंत्रज्ञान कंपन्या आणि उद्यम भांडवल गुंतवणूक कंपन्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने ही बँक बंद करण्याचा आदेश जारी केले होते. 


सिलिकॉन व्हॅली बॅंक नवे स्टार्टअप, कॅपिटल व्हेंन्चर्सला कर्ज पुरवठा करत होती. मात्र, मागील दीड वर्षात आयटी स्टार्टअप कंपन्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यातच अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेड रिझर्व्हकडून व्याज दरात वाढ करण्यात आली होती. या व्याज दरवाढीचा फटका बँकेलाही बसला.  मोठ्या दरवाढीमुळे बॅंकेला गंगाजळीच्या तुटवड्याचा सामना करावा लागला. 


बँकेने ग्राहकांच्या ठेवींचा वापर करून अब्जावधींचे बॉण्ड खरेदी केले होते. मात्र व्याजदर वाढल्याने त्याचे मूल्य घसरले. आयटी स्टार्टअप कंपन्या आणि ग्राहकांना घरघर लागल्यावर त्यांनी बॅंकेकडे आपल्या ठेवींची मागणी केली. आपल्याला पैशांची गरज असल्याचा तगादा त्यांनी लावला. त्याशिवाय, खातेदारांनी आपल्या ठेवी बँकेमधून काढण्यास सुरुवात केली. मात्र, एकीकडे गंगाजळी कमी असताना, दुसरीकडे बॉण्डचे मूल्य घसरल्याने बँक तोट्यात गेली. बँकेला बॉण्ड विक्री करून पैसे परत द्यावे लागले आणि अशातच दिवाळखोरीचं संकट ओढवलं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: