Alembic limited share: शेअर बाजारात (Stock Market) कधी काय होईल हे सांगता येत नाही. सध्या अलेम्बिक लिमिटेड या कंपनीचा शेअर चांगले उड्डाण घेत आहे. मंगळवारच्या इंट्राडे बाजारात या कंपनीच्या शेअरमध्ये साधारण 16 टक्क्यांनी तेजी दिसून आली. तिमाही निकाल सकारात्मक आल्यामुळे गुंतवणूकदारांनी या कंपनीत भरभरून पैसे गुंतवले आहेत. दरम्यान, सोमावारी या कंपनीच्या शेअरचे मूल्य 87.81 रुपये होते. आजच्या सत्रात हाच शेअर थेट 103  रुपयांपर्यंत गेला. सध्या या शेअरचे मूल्य 101.60 रुपये आहे. मे 2023 मध्ये या शेअरचे मूल्य 66 रुपये होते. फेब्रुवारी 2024 मध्ये हाच शेअर 107.50 रुपयांपर्यंत पोहोचला होता. 


कंपनीच्या तिमाही निकालात नेमके काय? 


या कंपनीने नुकतेच आर्थिक वर्ष 2023-24 (Q4FY24)  मधील जानेवारी-मार्च तिमाही जाहीर केली आहे. या तिमाहीचा निकाल चांगलाच सकारात्मक आला आहे. त्याचाच परिणाम म्हणून या कंपनीच्या शेअरचा आलेख आज वर जात असलेला दिसला. । मार्च तिमाही या कंपनीचे एकूण उत्पन्न 30.7 टक्क्यांनी वाढून 51 कोटी रुपये झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हे एकूण उत्पन्न 39 कोटी रुपये होते. या कंपनीचा नफादेखील Q4FY24 मध्ये 425 टक्क्यांनी वाढून थेट 21 कोटी रुपये झाला आहे. हा नफा गेल्या वित्त वर्षाच्या याच तिमाहीत फक्त 4 कोटी रुपये होता.  FY24 च्या डिसेंबरच्या तिमाहीत हा नफा 9.9 कोटी रुपये होता. म्हणजेच डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत मार्चच्या तिमाहीत या कंपनीच्या नफ्यात 110 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


कंपनीचे कोणाकडे किती शेअर्स, मालकी कोणाकडे? 


अलेम्बिक लिमिटेड ही कंपनी फार्मास्यूटिकल्स, रियल इस्टेट आणि वीजनिर्मिती क्षेत्रात काम करते. मार्च महिन्यापर्यंतच्या शेअर होल्डिंग पॅटर्नचा विचार करायचा झाल्यास या कंपनीचा साधारण 70.88  टक्के हिस्सा हा प्रमोटर्सच्या नावे आहे. पब्लिक शेयरहोल्डर्सजवळ कंपनीचा 29.12 टक्के हिस्सा आहे. या कंपनीच्या प्रमुख प्रमोटर्समध्ये चिरायु रमणभाई अमिन, मलिका चिरायु अमीन यांचा समावेश आहे. या दोघांकडेही क्रमश: 83,17,644 आणि 76,78,954 शेअर्स आहेत. 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


'या' तीन कंपन्याचे शेअर्स घेतल्यास पडेल पैशांचा पाऊस, जाणून घ्या सविस्तर!


अनेकवेळा अर्ज करूनही बँक क्रेडिट कार्ड का देत नाही? 'ही' आहेत प्रमुख कारणं, जाणून घ्या


शेअर मार्केटचा किंग व्हायचंय? मग फक्त 'या' पाच गोष्टी लक्षात ठेवा!