मुंबई : सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली आहे. निफ्टी 50 निर्देशांक 319 अंकांनी वाढून 25000 हजारांच्या पार पोहोचला. तर, सेन्सेक्समध्ये देखील 1046 अकांची तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजारातील तेजीची अनेक कारणं आहेत त्यापैकी एक कारण म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं प्रोजेक्टस फंडिंगसाठीच्या नियमांमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतल्यानं फायनान्स क्षेत्रात तेजी पाहायला मिळाली आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यातील तणाव वाढत असल्यानं शेअर बाजारातील तेजी किती दिवस कायम राहील याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. 

Continues below advertisement


सेन्सेक्समध्ये 1046 अंकांनी वाढ होऊन 82408 अंकांवर बंद झाला. निफ्टी 50 निर्देशांकात 319 अंकांची वाढ होऊन 25112 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी, बीएसई मिडकॅप, स्मॉलकॅपमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. 


निफ्टी बँक, वित्तीय सेवा, ऑटो, मेटल यातील स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगली कमाई करता आली. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स 1.21 टक्क्यांनी वाढले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड कंपन्यांचं बाजारमूल्य 5 लाख कोटींनी वाढून 447.81 लाख कोटी रुपये झालं. 


शेअर बाजारात तेजी का आली? 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं प्रोजेक्ट फंडिंगसाठीचे नियम सोपे केले.आरबीआयनं त्यांच्या गाईडलाईनमध्ये बँका, एनबीएफसी आणि सहकारी बँकांसाठीचे नियम सोपे केले आहेत. 


अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं 2025 मध्ये व्याज दरात दोनवेळा कपात करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळं महागाई कमी होण्यासंदर्भातील अपेक्षा वाढली आहे. 


अमेरिकन डॉलर निर्देशांक 0.34 टक्क्यांनी घसरुन 98.57 वर आला. कमजोर डॉलर आणि विदेश गुंतवणूकदारांना आकर्षित करुन भारतीय रुपयाला मजबूत केल्यानंबाजारातून इक्विटीला प्रोत्साहन मिळतेय. 


विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गेल्या दोन सत्रात भारतीय शेअर बाजारातून 1824 कोटी रुपयांची इक्विटीमध्ये खरेदी केली आहे. याशिवाय देशांतर्गत गुंतवणूकदारांनी देखील सलग 12 व्या दिवशी खरेदी सुरु ठेवली आणि 2566 कोटी रुपयांची खरेदी केली. 


शेअर बाजारात आज सर्वाधिक तेजी BEML कंपनीच्या स्टॉकमध्ये आल्याचं  पाहायला मिळालं. या स्टॉकमध्ये 10 टक्के तेजी आली असून स्टॉक 4600 रुपयांच्यावर ट्रेड करत होता. Kfin tech च्या शेअरमध्ये  5 टक्क्यांची तेजी आली. हा स्टॉक 1260 रुपयांवर ट्रेड करत होता. आयएफसीआयच्या स्टॉकमध्ये 4.28 टक्के, मॅक्स हेल्थकेअर शेअरमध्ये 3.28 टक्के , आयआरडीएआय 4 टक्के तेजी पाहायला मिळाली. प्रीमियर एनर्जीजच्या स्टॉकमध्ये 6 टक्के तर वारी एनर्जीजच्या स्टॉकमध्ये 8 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.  पॉवर फायनान्स कॉर्प 5 टक्के, हुंद्याई मोटर्स 3.42 टक्के आणि सीजी पॉवरमध्ये 3.34 टक्के तेजी आली आहे. 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)