Share Market Prediction Today: शेअर बाजारात गुरुवारी जागतिक पातळीवरील शेअर बाजारात तेजी दिसून आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात सकारात्मक झाली होती. मात्र, त्यानंतर विक्रीचा सपाटा सुरू झाल्याने बाजारात घसरण दिसून आली. गुरुवारी, बाजार घसरणीसह बंद झाला. सलग तिसऱ्या सत्रात बाजार घसरणीसह बंद झाला. 


मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये गुरुवारी सकाळी तेजी दिसून आली होती. मात्र, त्यानंतर खरेदीचा दबाव वाढू लागल्याने घसरण सुरू झाली. दिवस अखेर सेन्सेक्स 241.02 अंकांच्या घसरणीसह 60,826.22 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 71.75 अंकांनी घसरून 18,127.35 अंकांवर बंद झाला. 


सेन्सेक्स निर्देशांकातील महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो, अॅक्सिस बँक आणि एनटीपीसी यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, एशियन पेंट्स, कोटक महिंद्रा बँक, सन फार्मा आणि भारती एअरटेलच आदी कंपन्यांचे शेअर दर वधारले. बीएसई स्मॉलकॅपमध्ये 1.83 टक्क्यांची आणि मिडकॅपमध्ये 0.77 टक्क्यांची घसरण दिसून आली.


या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी


MACD इंडिकेटरनुसार, Wockhardt, Jubilant Foodworks, Vijaya Diagnostics कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, Jyothy Labs आणि Abbott India या कंपन्यांच्या शेअर दरात तेजीचे संकेत दिसत आहेत. 


या शेअर्समध्ये विक्रीचा जोर?


MACD इंडिकेटरनुसार, येस बँक (Yes Bank), सेंट्रल बँक (Central Bank), श्री रेणुका सुगर्स (Shree Renuka Sugars), आरबीएल बँक (RBL Bank) आणि बंधन बँक (Bandhan Bank) या बँकांच्य शेअर्स दरात घसरण दिसून येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय Tata Tele, Quess Corp, Lux, Borosil Renewables आणि Sheela Foam या बँकांच्या शेअर दरात विक्रीचा दबाव दिसत आहे. 


MACD इंडिकेटर काय आहे?


Moving Average Convergence/Divergence  (MACD) हे ट्रेंड रिव्हर्सलसाठी ओळखले जाते. MACD इंडिकेटरमध्ये सिग्नल लाइन ओलांडली की त्या शेअरमध्ये तेजी राहण्याचे संकेत समजले जातात. या MACD नुसार स्टॉकमधील संभाव्य तेजी आणि घसरण याचाही अंदाज लावता येतो. त्याआधारे संबंधित शेअर्समध्ये तेजी अथवा घसरण होणार याचा अंदाज लावता येतो. 


(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.)