Share Market FPI News : देशांतर्गत शेअर बाजारात विक्रीचा जोर असल्याने घसरण सुरू आहे (Share Market Latest News). जुलै महिन्यातही शेअर बाजारात घसरण सुरू आहे. या महिन्यात आतापर्यंत परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) शेअर बाजारातून 7400 कोटींहून अधिक शेअर्सची विक्री केली आहे.
अमेरिकेत मंदीचे सावट आणि डॉलर अधिक मजबूत होत असल्याच्या कारणाने परदेशी गुंतवणूकादारांकडून सातत्याने विक्रीचा सपाटा सुरू आहे. त्याआधी जून महिन्यात एफपीआयने भारतीय शेअर बाजारातून 50 हजार 203 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली होती.
मॉर्निंग स्टार इंडियाचे एसोसिएट संचालक-व्यवस्थापक संशोधन विभाग, हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले की परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्रीचा ओघ कमी झाला आहे. मात्र, अनेक गोष्टींमध्ये बदल झालेला नाही. मागील नऊ महिन्यांपासून परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात विक्री करत आहेत.
जियोजीत फायनान्शिअल सर्व्हिसेज मुख्य गुंतवणूक रणनीतिकार व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले की, परदेशी विनिमय बाजाराबाबत असलेली अनिश्चितता आणि डॉलर क सातत्याने मजबूत होत असल्याने आता परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात आगामी काळातही आक्रमकपणे विक्री सपाटा लावू शकतात असेही त्यांनी म्हटले.
कोटक सिक्युरिटीजचे प्रमुख इक्विटी संशोधक श्रीकांत चौहान यांनी सांगितले की, एफपीआयच्या खरेदी-विक्रीत चढ-उतार दिसून येऊ शकतो. वाढती महागाई, भूराजकीय स्थिती, मध्यवर्ती बँकांकडून घेतले जाणारे कठोर निर्णय यामुळे एफपीआयकडून विक्री सुरू राहू शकते.
डिपॉझिटरीने दिलेल्या माहितीनुसार, एक ते 15 जुलैपर्यंत एफपीआयने भारतीय शेअर बाजारातून 7,432 कोटींच्या शेअर्सची विक्री केली आहे. जून महिन्यात FPI कडून 50,203 शेअर्सची विक्री केली. मार्च 2020 नंतरची ही सर्वाधिक विक्री आहे. त्यावेळी एफपीआयने 61,973 कोटींच्या शेअर्सची विक्री केली आहे.
या वर्षी आतापर्यंत एफपीआयने भारतीय शेअर बाजारातून 2.25 लाख कोटींच्या शेअर्सची विक्री केली आहे. ही विक्रमी विक्री आहे. त्याआधी वर्ष 2008 मध्ये पूर्ण वर्षात त्यांनी 52,987 कोटी रुपयांची विक्री केली होती. त्याशिवाय, एफपीआयकडून कर्ज अथवा बॉण्ड बाजारातून 879 कोटी रुपये काढले आहेत.