मुंबई : देशभर दिवाळी सुरू असताना त्याचा उत्साह शेअर बाजारातही दिसून आला. शेअर बाजारात आज एक तासाच्या विशेष मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात तेजीने झाल्याचं दिसून आलं. मुहूर्त ट्रेडिंगच्या सुरुवातीला  सेन्सेक्स 663 अंकांनी उसळला आणि तो 59,970 अंकावर सुरू झाला. तर निफ्टीमध्येही 192 अंकाची वाढ होऊन तो 17,768 अंकांवर सुरू झाला.  सेन्सेक्समध्ये सुरवातीला 1.12 टक्क्यांची वाढ झाली तर निफ्टीमध्ये 1.10 टक्क्यांनी वाढ झाली.

  


मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात झाली त्यावेळी एल ॲंड टी, बजाज फायनान्स, एचडीएफसी बॅंक, एचडीएफसी, एनडीपीसी आणि महिंद्रा ॲंड महिंद्राच्या समभागात मोठी उसळी झाल्याचं दिसून आलं. तर कोटक बॅंक आणि एचयूएलच्या समभागात मात्र घसरण झाली. 


दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक तासासाठी शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगचा कार्यक्रम पार पडला जातो. लक्ष्मीपूजनाच्या विशेष ट्रेडिंगसाठी अभिनेता अजय देवगनने उपस्थिती लावली. थॅंक गॉड आणि दृश्यम-2 च्या पार्श्वभूमीवर अजय देवगनने हजेरी लावली. आज संध्याकाळी 6.15 ते 7.15 वाजेपर्यंत मार्केट सुरू राहणार आहे. 


मुहूर्त ट्रेडिंगमधील ब्लॉक डील सेशनची वेळ सायंकाळी 5.45 ते 6 वाजेपर्यंत होती. त्यानंतर प्री-ओपनिंग सेशन सायंकाळी 6 वाजता सुरू होऊन ते 6.08 वाजेपर्यंत चाललं. सायंकाळी 6.15 वाजता नॉर्मल मार्केट खुलं झालं. ते संध्याकाळी 7.15 वाजेपर्यंत सुरू राहील.  कॉल ऑक्शन सेशनचा कालावधी संध्याकाळी 6.20 ते 7.05 वाजेपर्यंत असणार असून क्लोजिंग सेशन संध्याकाळी 7.15 ते 7.25 वाजेपर्यंत असेल.   


शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा जवळपास 50 वर्षाहून अधिकची जुनी असल्याचं सांगितलं जातंय. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, दिवाळीच्या दिवशी केलेली गुंतवणूक लाभदायक समजली जाते. त्यामुळे आजची गुंतवणूक ही प्रतिकात्मक असून गुंतवणूकदारांचा कल हा खरेदीकडे अधिक असतो. मुहूर्त ट्रेडिंग करण्याची परंपरा मुंबई शेअर बाजारात 1957 आणि राष्ट्रीय शेअर बाजारात 1992 पासून सुरू झाली. 


FII आणि DII ची आकडेवारी 


संस्थात्मक परकीय गुंतवणूकदारांनी आणि भारतीय गुंतवणूकदारांनी 21 ऑक्टोबर रोजी केलेल्या गुंतवणुकीची आकडेवारी समोर आली आहे. या दिवशी परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 438.89 कोटी रुपयांची खरेदी केली. तर भारतीय गुंतवणूकदारांनी या दिवशी 119.08 कोटी रुपयांची विक्री केली. 


वर्ष 2021 मध्ये कसं होतं मुहूर्त ट्रेडिंग?


मागील वर्षी 4 नोव्हेंबर 2021 रोजी मुहूर्त ट्रेडिंग पार पडलं होतं. या विशेष एक तासाच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा गाठला होता. तर निफ्टी 17,921 अंकांवर स्थिरावला होता. यंदाच्या वर्षात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार दिसून येत आहे.