मुंबई :  शेअर बाजारात (Share Market) दिवाळीच्या निमित्ताने विशेष ट्रेडिंग सत्र (Special Trading Session) पार पडते. दिवाळीच्या निमित्ताने शेअर बाजारातील व्यवहार सुट्टीमुळे बंद असतात. मात्र, दिवाळीतील एका दिवसासाठी संध्याकाळी काही काळ शेअर बाजारातील व्यवहार सुरू असतात. या विशेष सत्राला मुहूर्त ट्रेडिंग (Share Market Muhurat Trading) म्हणतात. 


या काळात गुंतवणूकदार मुहूर्त ट्रेडिंग करतात. लोकांचा असा विश्वास आहे की यामुळे वर्षभर गुंतवणूक चांगली राहते. तुम्हालाही या दिवाळी मुहूर्तावर ट्रेड करायचे असल्यास तारीख आणि वेळ लक्षात ठेवा. राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) आणि मुंबई शेअर बाजार (BSE) रविवार, 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी मुहूर्तासाठी एक तास खुले राहणार आहे. 


मुहूर्त ट्रेडिंगची वेळ काय?


राष्ट्रीय शेअर बाजाराने (NSE) दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजार 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7.15 या वेळेत मुहूर्त ट्रेडिंगसाठी खुला असणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने, मुहूर्त ट्रेडिंग सत्रात प्री-ओपनिंग सत्र 8 मिनिटांसाठी असणार आहे. संध्याकाळी 6 ते 6.08 या वेळेत प्री-ओपनिंग सत्र असणार आहे. त्याशिवाय, ब्लॉक डील विंडो 5:45 वाजता उघडणार आहे. यानंतर सायंकाळी 6.15 ते 7.15 या वेळेत बाजारात सामान्य गुंतवणुकदारांसाठी बाजार खुला असणार आहे. 


>> मुहूर्त ट्रेडिंगचे शेड्यूल


> ब्लॉक डिल सेशन- सायंकाळी 5.45 ते 6 वाजेपर्यंत
> प्री-ओपनिंग सेशन- सायंकाळी 6 ते 6.08 वाजेपर्यंत
> नॉर्मल मार्केट - सायंकाळी 6.15 ते 7.15 वाजेपर्यंत
> कॉल ऑक्शन सेशन - सायंकाळी 6.20 ते 7.05 वाजेपर्यंत
> क्लोजिंग सेशन- सायंकाळी 7.15 ते 7.25 वाजेपर्यंत 



मुहूर्त ट्रेडिंग काय आहे?


शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा जवळपास 50 वर्ष जुनी आहे. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, दिवाळीच्या दिनी केलेली गुंतवणूक लाभदायक समजली जाते. त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल हा खरेदीकडे अधिक असतो. मुहूर्त ट्रेडिंग करण्याची परंपरा मुंबई शेअर बाजारात 1957 आणि राष्ट्रीय शेअर बाजारात 1992 पासून सुरू झाली. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिनी अनेकजण शेअर खरेदी करण्यावर भर देतात. मात्र, या दिवशी होणारी गुंतवणूक फार कमी आणि प्रतिकात्मक स्वरुपात असते.


दिवाळीनिमित्त होणाऱ्या एक तासाच्या ट्रेडिंगमध्ये बाजारात तेजी राहण्याची शक्यता आहे.  मुहूर्त ट्रेडिंग सुरू करण्याआधी शेअर बाजारात गणेश-लक्ष्मी पूजन होते. त्यानंतर ट्रेडिंगला सुरुवात होते. आज होणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :