Work From Home :  कोरोना महासाथीच्या काळात जगभरात वर्क कल्चर बदलले आहे. महासाथीच्या काळात अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम (Work From Home) सुरू करण्यात आले होते. या पद्धतीच्या कामाची अनेकांना सवय लागली आहे. आता, त्याचा परिणामही दिसू लागला आहे. अनेक ठिकाणी आता कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अनेकांना आता याचा त्रास वाटत असून अनेकजण नाईलाजाने ऑफिसमध्ये रूजू होत आहेत. मात्र, एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका पठ्ठ्याने 'वर्क फ्रॉम होम'साठी कोट्यवधींची नोकरी सोडली आहे.  


आठवड्यात तीन दिवस जावे लागत होते ऑफिसला...


हे प्रकरण अमेरिकेतील असून प्रसिद्ध ई-रिटेल कंपनी अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्याशी संबंधित आहे. नवीन वर्क पॉलिसी अंतर्गत, Amazon ने कर्मचार्‍यांना आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात येण्यास सांगितले आहे. अशा परिस्थितीतही कर्मचार्‍याने घरून काम करण्यासाठी कंपनीकडून मिळणारे करोडो रुपयांचे फायदे नाकारण्यास प्राधान्य दिले. आता संबंधित कर्मचारी त्याच्या अटींनुसार दुसऱ्या कंपनीत रुजू झाला आहे आणि घरून काम करत आहे.


या अटीवर नोकरीला सुरुवात केली


'बिझनेस टुडे'च्या वृत्तानुसार, अॅमेझॉनच्या या कर्मचाऱ्याने या अटीवर नोकरी सुरू केली होती की त्याला घरून काम करण्याची सुविधा मिळेल. यासाठी त्याने दुर्गम भागात घर घेतले होते. या कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे की, त्याचे कुटुंब आणि पाळीव प्राण्यांसोबत दुर्गम भागात राहणे हे त्याचे नेहमीच स्वप्न होते.


कंपनीने विनंती मान्य न केल्याने दिला राजीनामा


अॅमेझॉनने या कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये येऊन काम करण्यास सांगितले. अशा स्थितीत कर्मचाऱ्याने ऑफिसमध्ये येऊन काम करण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यानंतरही कंपनीकडून सकारात्मक भूमिका दिसून आली नाही. तेव्हा त्याने कंपनीला सांगितले की ऑफिस शहरात स्थलांतरित करण्यासाठी त्याला 1.5 लाख डॉलर्सपर्यंत खर्च होऊ शकतो. अशा स्थितीत त्यांनी कंपनीकडे रिलोकेशन पॅकेजची मागणी केली. कंपनीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्याने नोकरीचा राजीनामा दिला.


कोट्यवधींचे नुकसान....


कर्मचाऱ्याने सांगितले की, अॅमेझॉनची नोकरी सोडल्यानंतर तो आता दुसऱ्या कंपनीत काम करत आहे. अॅमेझॉनमध्ये त्याला आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात येण्यास सांगितले जात होते. नवीन कंपनीत त्याला घरून काम करण्याची सुविधा मिळाली आहे. पगारही जवळपास आधीच्या कंपनी एवढाच आहे. नवीन कंपनी छोटी आहे त्यामुळे कर्मचाऱ्याला Amazon सारख्या काही सुविधा मिळत नाहीत. Amazon मध्ये, त्या कर्मचाऱ्याला 2.03 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.60 कोटी रुपयांचे स्टॉक ऑप्शन मिळाले होते. मात्र, राजीनाम्यामुळे कर्मचाऱ्याला अॅमेझॉनच्या स्टॉक ऑप्शनचे फायदे गमवावे लागले आहेत.