Share Market Closing Bell : भारतीय शेअर बाजारात आज घसरण दिसून आली. सकाळी दिसून आलेला खरेदीचा जोर ओसरला आणि बाजारात विक्रीचा दबाव वाढलाा. जागतिक शेअर बाजारातील संकेत आणि गुंतवणूकदारांनी केलेली नफावसुली याच्या परिणामी शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स 60 हजारांखाली आला असून निफ्टीदेखील 18 हजार अंकांखाली घसरला आहे. 


आज शेअर बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 412 अंकांची घसरण झाली. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 126 अंकांची घसरण दिसून आली. सेन्सेक्स 59,934 अंकांवर तर निफ्टी  17,877 अंकांवर स्थिरावला. 


गुरुवारी शेअर बाजारात  ऑटो, मेटल्स, एनर्जी आदी सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. तर, बँकिंग, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मीडिया, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअरमध्ये विक्री दिसून आली.  स्मॉल कॅपच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. तर, मिड कॅपमध्ये तेजी दिसून आली. 


शेअर बाजारात सेन्सेक्सवर सूचीबद्ध असलेल्या 3620 कंपन्यांपैकी 1698 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1796 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. 126 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. आज शेअर बाजारातील व्यवहारांमध्ये 290 शेअरमध्ये अप्पर सर्किट  लागले. तर, 166 कंपन्यांच्या शेअर दरात लोअर सर्किट लागले. शेअर बाजाराचे आज बाजार भांडवल 285.87 कोटी रुपये इतके झाले.   


वधारणारे शेअर्स 


मारूती सुझुकीचा शेअर 2.70 टक्के, आयशर मोटर्सचा शेअर 2.27 टक्के, अदानी पोर्ट्स 2.18 टक्के, पॉवरग्रीडमध्ये 2.17 टक्के, एनटीपीसीच्या शेअर दरात 1.60 टक्के, कोल इंडियाच्या शेअर दरात 0.99 टक्क्यांची वाढ दिसून आली. 


घसरणारे शेअर्स


हिंदाल्कोच्या शेअर दरात 3.98 टक्के, इन्फोसिसच्या शेअर दरात 2.89 टक्के, टेक महिंद्राच्या शेअर दरात 2.84 टक्के, सिप्लाच्या शेअर दरात 2.61 टक्क्यांनी घसरण झाली. 


शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली. बुधवारी झालेल्या घसरणीनंतर आज बाजार सावरल्याचे चित्र होते. बँक आणि आयटी क्षेत्रातील शेअर वधारले आहेत. बुधवारी अमेरिकन शेअर बाजार घसरला होता. त्याचा परिणाम आशियाई बाजारावरही दिसून आला होता. प्री-ओपनिंग सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी वधारले होते. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स 113 अंकांनी वधारत 60460 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 18050 च्या पातळीवर होता.