Supriya Sule on vedanta foxconn Project :  वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn) गुजरातला गेल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांंनी महाराष्ट्रभर सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आंदोलन पुकारलं आहे. पुण्यात देखील खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या उपस्थिती राष्ट्रवादीतर्फे हातात लॉलीपॉप घेत आंदोलन करुन निदर्शनं केली. पुण्यातील जंगली महाराज रस्त्याजवळील झाशीची राणी पुतळ्याजवळ हे आंदोलन केलं. 


"महाराष्ट्राला काय मिळालं? लॉलीपॉप लॉलीपॉप.." अशाप्रकारच्या अनोख्या घोषणाबाजी करत त्यांनी हे आंदोलन केलं. राज्य सरकारवर टीका करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते कायम वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करत असतात. यावेळी त्यांनी लॉलीपॉप हाती घेत निदर्शनं केली. फॉक्सकॉन प्रकल्पावरुन आता महाराष्ट्राचं राजकारण तापताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प भाजपमुळे गुजरातमध्ये गेल्याचा आरोप नेत्यांकडून केला जात आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर नेल्यानंतर यापेक्षा मोठे प्रकल्प महाराष्ट्राला देऊ असं आश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. मात्र हे आश्वासन फोल आहे. या सगळ्यात महाराष्ट्राला लॉलीपॉप देण्यात आलं आहे, असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. 


सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे प्रकल्प महाराष्ट्रात न येता गुजरातमध्ये गेला : सुप्रिया सुळे
वेदांता फॉक्सकॉन ग्रुपचा 1 लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. परंतु सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता गुजरातमध्ये जाणार आहे, यामुळे महाराष्ट्रातील हजारो युवक बेरोजगार होणार आहेत, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने आपला प्रकल्प गुजरातमध्ये हलवला आहे. यावरुन शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्प हा 2018 पासून रखडलेला आहे. त्यातच आता कोकणातील रिफायनरी प्रकल्प देखील महाराष्ट्रातून बाहेर जाणार का? अशी भीती निर्माण झाली आहे.


'दोन मुख्यमंत्री नेमा पण मराठी तरुणांचा रोजगार हिसकावून घेऊ नका'
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार बुडाला आहे.मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी कऱण्यासाठी वाटेल ते केले जात असून हा प्रकल्प गुजरातला हलवण्यामागे हीच मनोवृत्ती कारणीभूत आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी राज्याला गंभीर मुख्यमंत्र्याची गरज असून वेळ पडली तर दोन मुख्यमंत्री नेमा पण मराठी तरुणांचा रोजगार हिसकावून घेऊ नका, अशी खोचक टिप्पणीही सुप्रिया सुळे यांनी केली. 


ईडी सरकारने हक्काचा घास हिरावून घेतला : प्रदीप देशमुख 
राज्यातील एक ते सव्वा लाखांहून अधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता असणारा सुमारे 1 लाख 58 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. महाविकास आघाडी सरकारने सर्व काही सुरळीतपणे पार प्रक्रिया पार पाडून हा प्रकल्प महाराष्ट्रत साकारण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे काम केले होते. ईडी सरकारने तरुणांच्या हक्काचा घास हिरावून घेतला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केला आहे