मुंबई :  भारतीय शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 400 अंकांनी वधारला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने (NSE Nifty) 19,800 अंकाची पातळी ओलांडली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी  दिसून आली. 


दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 393.69 अंकांनी वधारत 66,473.05 वर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 121.50 अंकांच्या तेजीसह 19,811.35 वर स्थिरावला. 


बाजाराच्या तेजीसाठी सर्वात मोठा आधार मजबूत जागतिक संकेतांमुळे (Global Clue) आला. अमेरिकेतील व्याजदरात वाढ होण्याचे संकेत कमी झाले आहे. त्याचे प्रतिबिंब दिसून आले. इस्रायल-हमास युद्धाचा (Israel Hamas War) परिणाम आखाती देशांपुरता मर्यादित राहावा, असाही अंदाज गुंतवणूकदारांकडून दिसून आला आहे. त्याशिवाय सौदी अरेबियाने (Saudi Arebia) कच्च्या तेलाच्या किमतीतील (Crude Oil Price) अस्थिरता थांबवण्याचे आश्वासन दिले आहे. या सगळ्यामुळे जागतिक बाजारांत सकारात्मकता (Global Share Market) दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला.


आजच्या व्यवहारात, एफएमसीजी सेक्टरमध्ये झालेल्या खरेदीमुळे निफ्टी एफएमसीजी निर्देशांक 0.85 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. निफ्टी एनर्जी 0.89 टक्के, मेटल, बँकिंग, फार्मा, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस, ऑटो सेक्टरमधील शेअर्स तेजीसह बंद झाले. तर आयटी आणि पीएसयू बँक सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. आजच्या व्यवहारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. 


आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 24 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली. तर, निफ्टीच्या 50 कंपन्यांपैकी 39 कंपन्यांच्या शेअर्स दरात वाढ दिसून आली.


आजच्या व्यवहारात विप्रोच्या शेअर दरात 3.39 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 2.09 टक्के, रिलायन्स 1.62 टक्के, एचयूएल 1.57 टक्के, नेस्ले 1.15 टक्क्यांनी वधारले. एचसीएल टेकच्या शेअर दरात 1.51 टक्क्यांची घसरण दिसून आली. टीसीएस 0.42 टक्के, एसबीआय 0.41 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.


गुंतवणूकदारांना फायदा 


मुंबई शेअर बाजारावर (BSE) सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 11 ऑक्टोबर रोजी वाढून 321.61 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. आधीच्या व्यवहाराच्या दिवशी हे बाजार भांडवल 10 ऑक्टोबर रोजी 319.71 लाख कोटी रुपये होते. आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांना 1.90 लाख कोटींचा फायदा झाला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :