मुंबई: भारतीय शेअर बाजारात (Share Market) सलग चौथ्या दिवशी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आज सेन्सेक्समध्ये तब्बल 1172 अंकांची घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना याचा मोठा फटका बसला असून त्याचे तब्बल चार लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये 4.7 टक्के इतकी मोठी घसरण झाल्याचा फटका गुंतवणूकदारांना बसल्याचं सांगितलं जातंय.
आयटी क्षेत्रासह बँकिंग आणि वित्तीय सेवा, टेलिकॉम, कॅपिटल गूड्स, आरोग्य या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. ऑटो, मेटल, एफएमजीसी आणि उर्जा या क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री झाल्याचं दिसून आलं.BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 1 टक्क्यांची घसरण झाली आहे.
गुंतवणूकदारांच्या आजच्या झालेल्या नुकसानीनंतर बीएसई मार्केटच्या भांडवलामध्ये घट झाली असून ते 272.03 लाख कोटीवरून 267.98 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
आठवड्याभरात 6.6 लाख कोटी रुपये पाण्यात
शेअर बाजारात आज सलग सत्रामध्ये घसरण झाली आहे. गेल्या आठवडाभरात गुंतवणूकदारांची जवळपास 6.6 लाख कोटी रुपयाहून अधिक रक्कम पाण्यात गेली आहे. या काळात शेअर बाजार तब्बल चार टक्क्यांनी घसरल्याचं दिसून आलं आहे.
शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1172 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 302 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 2.01 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,166 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.73 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,173 वर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: