SBI MCLR Hikes : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गृह कर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्ज महाग झाले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिग रेट (MCLR) वर घेण्यात येणाऱ्या सर्व कालावधीच्या कर्जाच्या व्याज दरात वाढ केली आहे. एसबीआय 0.10 टक्के इतकी वाढ केली आहे. बँकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, MCLR मध्ये 15 एप्रिलपासून वाढ होणार आहे.
किती वाढला दर
बँकेने एक दिवस, एक महिना आणि तीन महिन्यांच्या MCLR मध्ये 6.65 टक्क्यांमध्ये वाढ करून 6.75 टक्के इतका केला आहे. तर, सहा महिन्यांच्या MCLR मध्ये 6.95 टक्क्यांहून 7.05 इतका केला आहे. देशातील सर्वात मोठ्या लेंडरने एक वर्षासाठी MCLR मध्ये 7 टक्क्यांहून 7.10 टक्के इतकी वाढ केली आहे. तर, दर दोन वर्षाच्या एमसीएलआरसाठी 7.20 टक्क्यांहून 7.30 टक्के आणि तीन वर्षांसाठी 7.40 टक्के इतका दर केला आहे.
बँक ऑफ बडोदाने दर वाढवले
या दरम्यान, बँक ऑफ बडोदानेदेखील सर्व कालावधीच्या कर्जासाठी MCLR मध्ये 0.05 टक्के वाढ केली आहे. हा नवीन दर 12 एप्रिलपासून लागू करण्यात आला. एक वर्षाच्या कालावधीसाठी MCLR दर हा 7.35 टक्के करण्यात आला आहे. तर, एक दिवस, एक महिना, तीन महिने आणि सहा महिने या कालावधीसाठीच्या MCLR मध्ये अनुक्रमे 6.50 टक्के, 6.95 टक्के, 7.10 टक्के आणि 7.20 टक्के इतका दर वाढवण्यात आला.
MCLR म्हणजे काय?
Marginal Costs of Fund-Based Lending Rate म्हणजे MCLR हा रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीनंतर लागू केला. MCLR मुळे ग्राहकांना कर्ज घेणे सोपं झालं. MCLR म्हणजे घेतलेल्या कर्जावरील किमान व्याज दर असतो. याआधी कर्जाच्या व्याजासाठी बेस रेट असायचा. मात्र, आरबीआयने 1 एप्रिल 2016 पासून MCLR लागू केला. बँक आणि ग्राहक या दोघांचाही फायदा व्हावा, बँकेच्या व्याज दर ठरवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी MCLR लागू करण्यात आला.