मुंबई: भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने ब्लॅक मंडे ठरला असून बाजारात आज मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांचं सात लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. दलाल स्ट्रीटवर सेन्सेक्समध्ये आज जवळपास तीन टक्क्यांची घसरण झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांसाठी हा मोठा धक्का असल्याचं दिसून येतंय.
अमेरिकेमध्ये महागाईचा उच्चांक, भारतीय शेअर बाजारावर परिणाम
अमेरिकेला गेल्या 40 वर्षांमधील सर्वाधिक महागाईला तोंड द्यावं लागत असून त्या ठिकाणची महागाई 8.6 टक्क्यांवर पोहोचली आहे. वाढत्या महागाईला नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
फेडरल बँकेकडून व्याज दर वाढण्याची शक्यता
फेडरल रिझर्व्हकडून 14 आणि 15 जून दरम्यान बैठक होणार आहे. या बैठकीत 75 बेसिस पॉईन्टसच्या व्याज दरवाढीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या आधी 50 बेसिस पॉईन्टसच्या व्याज दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढत असून सुरक्षित ठिकाणी गुंतवण्यासाठी शेअर विक्री करत आहेत.
डॉलरच्या तुलनेत रुपयाने तळ गाठला
डॉलरच्या तुलनेत आजही रुपयाची घसरण झाली आहे. शुक्रवारच्या 77.84 रुपयाच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 78.28 रुपयांवर पोहोचली आहे. रुपयाची ही आतापर्यंतची निचांक्क पातळी आहे. त्यामुळे आता एका डॉलरसाठी 78.28 रुपये मोजावे लागणार आहेत. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि अमेरिकेतील महागाई दर यामुळे एका डॉलरच्या तुलनेत रुपयांची ऐतिहासिक घसरण झाली आहे.
आरबीआयकडून रेपो दरात वाढ
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून गेल्या आठवड्यात नवीन रेपो दर जाहीर करण्यात आला. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. सध्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यावर रिझर्व्ह बँकेचे प्रमुख लक्ष्य असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे. आरबीआयच्या नव्या पतधोरणानुसार आता रेपो दर 4.90 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे कर्ज महागणार असून ईएमआयदेखील वाढणार आहे.