SEBI: शापूरजी पालोनजी उद्योग समूहाच्या एकॉन्स इन्फ्रास्टक्चर (Afcons Infrastructure) या दिग्गज कंपनीचा आयपीओ लवकरच येणार आहे. भांडवली बाजार नियामक सेबीने या कंपनीच्या आयपीओला नुकतीच मंजुरी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकॉन्स इन्फ्रास्टक्चर या कंपनीचा आयपीओ साधारण 7000 कोटी रुपयांचा असू शकतो. या कंपनीने आयपीओच्या मंजुरीसाठी सेबीकडे मार्च, 2024 मध्ये कागदपत्रे सोपवली होती. शापूरजी पालोनजी ग्रुपची ही कंपनी मोठ्या प्रोजेक्स्टसाठी ओळखली जाते.
किती शेअर विकले जाणार
मिळालेल्या माहितीनुसार एकॉन्स इन्फ्रास्टक्चर ही कंपनी आयपीओमध्ये 1,250 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर विकणार आहेत. तर ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून गोस्वामी इन्फ्राटेक (Goswami Infratech) 5,750 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहे. फ्रेश इश्यूच्या माध्यमातून निर्माण झालेल्या पैशांतून ही कंपनी गरजेची कामे करणार आहे. यासह कर्जाची परतफेड करण्यासाठीही या पैशांचा वापर केला जाणार आहे. एकॉन्स इन्फ्रास्टक्चर या कंपनीने या आयपीओसाठी आयसीआयसीआय सिक्योरिटीज, डॅम कॅपिटल, जेफरीज, नोमुरा, नुवामा आणि एसबीआय कॅपिटल बुक रनिंग लीड मॅनेजर तर लिंक इनटाइम ला रजिस्ट्रार म्हणून नियुक्त केले आहे. गेल्या काही दिवसांत शापूरजी पालोनजी उद्योग समूहाने आपल्यावरचे कर्ज कमी करण्यासाठी वेगवेगळ्या मालमत्तांत निर्गुंतवणूक केलेली आहे.
शापूरजी पालोनजी उद्योग समूहाच्या दोन कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध
एकॉन्स इन्फ्रास्टक्चर या कंपनीत प्रमोटर आणि प्रमोटर ग्रुपची 99.48 टक्के हिस्सेदारी आहे. याआधी शापूरजी पालोनजी ग्रुपने स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी (Sterling and Wilson Renewable Energy) या कंपनीचा आयपीओ बाजारात आणला होता. हा आयपीओ अगस्त, 2019 मध्ये शेअर बाजारवर सूचिबद्ध झाला होता. त्यानंतर या कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) खरेदी केले होते. सध्या शापूरजी पालोनजी उद्योग समूहाच्या फोर्ब्स अँड कंपनी (Forbes & Co) आणि गोकाक टेक्सटाइल्स (Gokak Textiles) या दोन कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध आहेत.
इन्फ्रास्ट्रकचर क्षेत्रात कंपनीचं मोठं नाव
एकॉन्स इन्फ्रास्टक्चर ही कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात प्रसिद्ध आहे. या कंपनीने मरीन, शहरी विकास, हायड्रो, अंडरग्राउंड आणि ऑइल अँड गॅस सेक्टरमधील मोठे प्रोजेक्ट्स यशस्वीपणे पूर्ण केलेले आहेत. या कंपनीकडे 2021 साली 26,248.46 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स होत्या. 2023 साली याच ऑर्डर्स 30,405.77 कोटी रुपयांवर पोहोचल्या होत्या. या कंपनीचा महसूल आर्थिक वर्षे 2022-2023 मध्ये 14.69 टक्क्यांनी वाढून 12,637.38 कोटी रुपये झाला होता. या कंपनीचा नफादेखील 14.89 टकक्यांनी वाढून 410.86 कोटी रुपयांवर पोहोचला होता.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
मोठी बातमी! सुकन्या समृद्धी योजनेत मोठे बदल, पॅन, आधार कार्डचा 'हा' नियम सर्वांत महत्त्वाचा