SEBI: भांडवली बाजार नियामक सेबीने रॉयल ट्विंकल स्टार क्लब (Royal Twinkle Star Club) आणि सिट्रस चेक इन्सच्या Citrus Check Inns) 46 मालमत्तेचा 97 कोटी रुपयांपेक्षा जास्त आरक्षित किंमतीवर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या लिलावासाठी 6 एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे. सेबीने हे उचलेलं पाऊल कंपन्यांनी उभारलेले हजारो कोटी रुपयांचे पैसे वसूल करण्याच्या सेबीच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.


लिलाव होणार्‍या मालमत्तेमध्ये ऑफिस कॉम्प्लेक्स, निवासी फ्लॅट्स, भूखंड आणि महाराष्ट्र, गुजरात, दमण आणि दादरा आणि नगर हवेली येथल्या दुकानांचा समावेश आहे. एका जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने लिलाव 6 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान केला जाईल असं स्पष्ट केलं आहे.


नोव्हेंबर 2019 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत, कंपन्यांच्या 220 हून अधिक मालमत्तांचा 1,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त राखीव किंमतीवर लिलाव करण्यात आला होता. डिसेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर हे पाऊल उचलले होते. या आदेशात सेवानिवृत्त न्यायमूर्ती जेपी देवधर यांच्या अध्यक्षतेखालील विक्री-सह-निरीक्षण समितीला सहा महिन्यांत कंपन्यांच्या 114 मालमत्तांची विक्री करण्याचे निर्देश देण्यात आले होते.


डिसेंबर 2018 मध्ये, सेबीने त्यांच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल सिट्रस चेक इन्स आणि त्यांच्या संचालकांना 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला. याशिवाय त्यांना जनतेकडून निधी गोळा करण्यापासून रोखण्यात आले होते. सेबीकडे सिट्रसविरोधात अनेक गुंतवणूकदारांच्या तक्रारी आल्या होत्या. रॉयल ट्विंकलचे संचालक आता त्यांची सामूहिक गुंतवणूक योजना (CIS) सिट्रसच्या माध्यमातून चालवत असल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे.


ऑगस्ट 2015 मध्ये, नियामकाने रॉयल ट्विंकल आणि तिच्या चार संचालकांवर बनावट टाइमशेअर हॉलिडे प्लॅनच्या नावाखाली बेकायदेशीरपणे 2 हजार 656 कोटी रुपये जमा केल्याबद्दल चार वर्षांची बंदी घातली. याशिवाय सेबीने कंपनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना तीन महिन्यांत वचन दिलेल्या परताव्यात गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे निर्देशही दिले होते.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha