GT Vs CSK: आयपीएलच्या काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्जवर 3 विकेट्सनं विजय मिळवला. डेव्हिड मिलर आणि राशीद खान यांच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरातनं चेन्नईच्या तोंडातून विजयी घास हिसकावला. शेवटच्या षटकांपर्यंत रंगलेल्या सामन्यात डेव्हिड मिलर आणि राशीद खानच्या फटकेबाजीमुळं चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात चेन्नईसाठी ख्रिस जॉर्डन चांगलाच महागात पडला. त्याने सामन्यात 3.5षटकात 58 धावा दिल्या. तिसऱ्या षटकात तब्बल 25 धावा दिल्यानंतर त्याला शेवटचं षटक दिल्यावरुन चेन्नईचा कर्णधार रविंद्र जाडेजावर टीका होत आहे. 


यावर रविंद्र जाडेजानं स्पष्टीकरण दिलं आहे. जाडेजानं म्हटलं आहे की, आम्ही पहिल्या सहा षटकांमध्ये चांगली कामगिरी केली. शेवटच्या पाच षटकांमध्ये आम्ही सातत्य कायम ठेवू शकलो नाही. डेव्हिड मिलरने खूप चांगली खेळी केली. जॉर्डन हा अनुभवी गोलंदाज आहे त्यामुळे आम्ही 20व्या षटकात त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तो चार किंवा पाच यॉर्कर टाकू शकतो पण दुर्दैवाने आज तसे झाले नाही, असं जाडेजा म्हणाला. 


या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघाची सुरुवात खराब झाली. पण डेव्हिड मिलर आणि राशीद खान यांच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरातनं विजय मिळवला. 


नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडनं 48 चेंडूत 73 धावा केल्या. ज्यात पाच षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. तर, रायडूनं 31 चेंडूत 46 धावा केल्या. त्यानं दोन षटकार आणि चार चौकार मारले. ऋतुराज आणि रायडू बाद झाल्यानंतर शिवम दुबे आणि  कर्णधार रवींद्र जाडेजानं शेवटच्या काही षटकात चांगली फटकेबाजी केली. ज्यामुळं चेन्नईच्या संघानं 20 षटकात चार विकेट्स गमावून 169 धावा केल्या. 


चेन्नईच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाचा सलामीवीर शुभमन गिल खाते न उघडताच बाद झाला. तो बाद झाल्यानंतर विजय शंकरही शून्यावर बाद झाला. त्यानंतर अभिनव मनोहरही फार काही करू शकला नाही आणि त्यानं 12 धावांवर तिची विकेट्स गमावली.त्यानंतर मिलरनं साहासोबत मिळून संघाची धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण साहाही 11 धावा करून बाद झाला. 48 धावांत 4 विकेट्स गमावल्यानंतर राहुल तेवतिया आणि मिलरने संघाचा डाव सावरला. दोघांनी 39 धावांची भागीदारी केली.राहुल तेवतिया बाद झाल्यानंतर मिलर आणि रशीद खाननं अर्धशतकी भागीदारी करत सामना गुजरातच्या बाजूनं झुकवला. राशिदने अवघ्या 21 चेंडूत 40 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर मिलरनं आक्रमक फलंदाजी कायम ठेवत गुजरातला विजय मिळवून दिला.



हे देखील वाचा-