Bank Interest Rate on Fixed Deposits: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नं रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर, खाजगी आणि सरकारी बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींचे (Fixed Deposits) व्याजदर (Interest Rate) वाढवले ​​आहेत. अनेक बँकांनी ज्येष्ठ नागरिकांच्या (Senior Citizen) मुदत ठेवींवरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे. सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर अधिक व्याज मिळतं. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) पासून एचडीएफसी बँकेनं (HDFC) ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.


HDFC बँकेत मुद ठेवींवर किती व्याज?


HDFC बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँक आता ज्येष्ठ नागरिकांना सात दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 3.50 टक्के ते 7.50 टक्के व्याज देत आहे.


HDFC बँक ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक 7.75 टक्के व्याज देत आहे. HDFC बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, नवे व्याजदर 14 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. सामान्य गुंतवणूकदारांना पाच वर्षांच्या एका दिवसापासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 7 टक्के व्याज मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला 7.75 टक्के परतावा मिळेल.


कॅनरा बँकेनंही केले बदल 


कॅनरा बँकेनं 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरातही वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, नवे दर 19 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. बँक सात दिवसांपासून ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 3.25 टक्के ते 7.50 टक्के व्याज देतेय.


60 बेसिस पॉईंट्ची वाढ


ICICI बँकेनं 2 कोटी रुपयांच्या FD वरील व्याजदरात 60 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. FD वरील नवे व्याजदर 16 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहेत. बँक आता सात दिवसांपासून ते 10 वर्षांच्या एफडीवर 3.5 टक्के ते 7.50 टक्के व्याज देत आहे. जर एखाद्यानं एका दिवसापासून ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD मध्ये गुंतवणूक केली तर त्याला 6.90 टक्के दरानं व्याज मिळेल. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के दरानं व्याज मिळणार आहे.


स्टेट बँकेनं व्याजदरात केली वाढ


देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं दोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात 65 बेसिस अंकांची वाढ केली आहे. नवे दर 23 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. आता सात दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्के ते 7.25 टक्के व्याज मिळेल. स्टेट बँकेनं 211 दिवसांपासून एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदर 5.50 टक्क्यांवरून 5.75 टक्के केला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीतील एफडीवर 6.25 टक्के दरानं व्याज मिळेल. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


भारताचा विकासदर 6.1 टक्के राहणार, तर महागाई हळूहळू कमी होणार : आयएमएफ