मुंबई : सध्या भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) मोठे चढऊतार पाहायला मिळत आहेत. असे असताना सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बँक (एसबीआय) या बँकेच्या शेअरने (SBI Bank Share) मात्र मोठी मुसंडी मारली आहे. गुरुवारी बाजार चालू झाल्यानंतर एसबीआयच्या शेअरने 800 रुपयांचे मूल्य पार करत सार्वकालिक उच्चांक काढला. अॅक्सिस आणि (Axis Bank) इंडसइंड बँकेने (Indusind Bank) नुकतेच आपले तिमाही निकाल जारी केले आहेत. या दोन्ही बँकांनी या तिमाहीत चांगला नफा मिळवला आहे. याच कारणामुळे गुरुवारी शेअर बाजारात बँकिंग क्षेत्रातील शेअर्स आलेखात वरच्या दिशेने जाताना दिसले.
गुरुवारी बँकेच्या शेअरमध्ये वाढ
SBI बँकेच्या शेअरमध्ये गुरुवारी चांगली वाढ झाल्याचं पाहायला मिळालं . हा शेअर गुरुवारी सुरुवातीला 805.95 रुपयांपर्यंत पोहोचला. शेअर बाजाराचा व्यवहार संपेपर्यत या शेअरमध्ये 5.12 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. दिवसाअखेर हा शेअर 812.70 पर्यंत वाढला होता. आज मात्र बाजार चालू झाल्यानंतर या शेअरची किंमत कमी झाली आहे. सध्या हा शेअर 805.85 रुपयांवर ट्रेंड करतोय. मात्र आगामी काही दिवसांत एसबीआय बँकेच्या शेअरमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आगामी काळात एसबीआय बँकेचा शेअर चांगला परतावा देणार
अॅक्सिस सिक्योरिटीजचे राजेश पालवीय यांनी या शेअरबाबत सविस्तर माहिती दिली आहे. "पुढच्या दोन ते तीन दिवसांत हा शेअर 820-830 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. जोखीम पत्करायची नसेल तर 750 रुपयांचा स्टॉप लॉस लावता येईल. त्यामुळे आगामी काळात एसबीआय बँकेचा शेअर तुम्हाला चांगला परतावा देण्याची शक्यता आहे.
अॅक्सिस बँकेचा नवा रेकॉर्ड
मार्चच्या तिमाहीचे निकाल आल्यानंतर तसेच कोटक महिंद्रा बँकेवर निर्बंध लागू झाल्यामुळे बाजार भांडवलाच्या तुलनेत Axis Bank ही देशातील चौथी सर्वांत मोठी कर्जदाता बँक झाली आहे. या तिमाहीत अॅक्सिस बँकेचा निकाल चांगला आला आहे. याच कारणामुळे एसबीआय बँकेच्या शेअरमध्येही मोठी वाढ पाहायला मिळाली. दुसरीकडे कोटक महिंद्र बँकेवर निर्बंध लागू केल्यानंतर या बँकेचे शेअर 10 टक्क्यांनी घरंगळले.
एसबीआयने सहा महिन्यात किती रिटर्न दिले?
फिच रेटिंग्जच्या म्हणण्यानुसार एसबीआयचा बिझनेस प्रोफाईल स्कोअर इतर भारतीय बँकांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. या बँकेमध्ये इतर बँकांच्या तुलनेत कमी जोखीम आहे. एसबीआय बँकेचा शेअर गेल्या सहा महिन्यांत 40 48.45 टक्के वधारला आहे.
(टीप- माहिती देणे, हाच या लेखामागचा उद्देश आहे. कोठेही प्रत्यक्ष गुंतवणूक करण्याआधी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
हेही वाचा :
30 हजार रुपये गुंतवा अन् व्हा 5 कोटींचे मालक, जाणून घ्या करोडपती बनवणारा SIP चा 'हा' फॉर्म्यूला!
घसरणीचा ट्रेंड संपला, आज सोन्याच्या दरात तेजी, कोणत्या शहरात किती दर?
मतदान करा, सवलत मिळवा! मतदारासांठी फ्लाइट ते जेवणापर्यंत खास सूट, सविस्तर माहिती एका क्लिकवर