मुंबई : आपल्याजवळ असलेल्या पैशांपासून आणखी काही पैसे कमवावेत यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो. गेल्या काही दिवसांपासून एसआयपीच्या (SIP) माध्यमातील गुंतवणुकीला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. अशा प्रकारे केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे थोडा अभ्यास करून नियमितपणे एसआयपीएमध्ये पैसे गुंतवल्यास कोट्यधीश होण्याचीही संधी आहे. याच पार्श्वभूमीवर एसआयपीएच्या माध्यमातून कोट्यधीश कसे होता येईल हे जाणून घेऊ या...
19 वर्षांच्या गुंतवणुकीवर होता येईल कोट्यधीश
प्रत्येक महिन्याला तीस हजार रुपयांची एसआयपी करून तुम्हाला कोट्यधीश होता येते. सलग 19 वर्षे अशा प्रकारची गुंतवणूक केल्यास तुम्हाला थेट पाच कोटी रुपयांचा एकूण निधी मिळवता येऊ शकेल. एसआयपी अनेक अर्थांनी वेगळी आहे. कारण यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळतो. तसेच या गुंतवणुकीत कंपाऊंडिंगचाही लाभ मिळतो. चांगला परतावा तसेच कंपाऊंडिंगचा फायदा यामुळे जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला एकगठ्ठा मोठी रक्कम मिळते.
म्यूच्यूअल फंडमध्ये जोखीम कमी
तसं पाहायचं झालं तर शेअर बाजार आणि म्यूच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याआधी यामध्ये जोखीम आहे, हे समजून घेतले पाहिजे. कारण बाजारातील चढ-उतारामुळे शेअर बाजार आणि म्यूच्यूअल फंडामध्ये तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर कमी-अधिक प्रमाणात परतावा मिळतो. यामध्ये तुम्हाला कधी नुकसानही होऊ शकते. मात्र शेअर बाजाराच्या तुलनेत म्यूच्यूअल फंड हे कमी जोखमीचे म्हटले जाते. म्यूच्यूअल फंडमध्ये गुंतवलेल्या रकमेतून आपल्याला साधारण 10 ते 15 टक्के परतावा मिळतोच. किंवा कधीकधी यापेक्षाही अधिक परतावा मिळू शकतो. जास्त अवधीसाठी (लाँग टर्म) तुम्ही एसआयपी केल्यास हाच परतावा 18 ते 20 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.
30 हजार रुपये गुंतवल्यास तुम्ही कोट्यधीश कसे होणार?
एसआयपीच्या माध्यमातून प्रतिमहा तीस हजार रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही थेट कोट्यधीश बनू शकता. समजा तुम्ही प्रतिमहा एखाद्या फंडामध्ये 30 हजार रुपयांची गुंतवणूक केली. आणि याच गुंतवणुकीत प्रत्येक वर्षाला 10 टक्क्यांचा वाढ केल्यास 12 टक्के परताव्याच्या हिशोबाने तुम्हाला 19 वर्षांत थेट पाच कोटी रुपये मिळतील.
फक्त दहा वर्षांत जमा होणार एक कोटी रुपये
प्रतिमहा तीस हजार रुपयांची एसआयपी आणि या रकमेत प्रतिवर्ष 10 टक्क्यांची वाढ, असे सूत्र वापरल्यास तुमचे अवध्या तीन वर्षांत 50 लाख रुपये जमा होतील. पुढे असेच सूत्र कामय ठेवल्यास 12 टक्के परताव्याच्या दराने 10 वर्षांत तुम्हाला एक कोटी रुपये परतावा मिळेल. 19 वर्षांपर्यंत ही रक्कम पाच कोटी रुपये होईल. समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला 30 हजार रुपयांची एसआयपी केली. पण दरवर्षी या गुंतवणुकीत 10 टक्क्यांनी वाढ नाही केली, तर 12 टक्के परताव्याच्या हिशोबाने पाच कोटी रुपये मिळण्यासाठी 24 वर्ष लागतील.
(टीप- फक्त माहिती देणे हाच या लेखाचा उद्देश आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक करायची असल्यास या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
हेही वाचा :
भारताला फायदा चीनला फटका, व्यापारात भारतानं घेतली आघाडी, सेवा निर्यातीत मोठी वाढ