5 Crore Rupees Corpus: आजकाल नोकरदार लवकर निवृत्ती घेतात. लवकर निवृत्त होऊन पुढचे आयुष्य सुखाने जगण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. वृद्धापकाळात चरितार्थासाठी आर्थिक नियोजन झालेले असेल तर मग वयाच्या 60 वर्षांपर्यंत काम करण्याची गरज काय आहे? असा सवाल अनेकजण करतात. त्यामुळेच लवकर निवृत्त व्हायचे असेल तर त्यानुसार तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन आखायला हवे. याच पार्श्वभूमीवर लवकर निवृत्त होण्याचा विचार करत असाल तर आर्थिक नियोजनाचे तीन वेगवेगळे पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या आर्थिक नियोजनानुसार तुमच्याकडे वयाच्या 50 व्या वर्षी तब्बल 5 कोटी रुपये असू शकतात.
स्ट्रॅटेजी क्रमांक एक
तुमचे वय हे 25 वर्षे असून तुम्हाला 50 व्या वर्षी निवृत्त व्हायचे आहे असे गृहित धरुया. म्हणजेच तुमच्याकडे कामाचे अजून 24 वर्षे बाकी आहेत. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर साधारण 10 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात असे गृहित धरूया. तुम्हाला अशा स्थितीत वयाच्या 50 व्या वर्षी पाच कोटी रुपायांचा फंड हवा असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षी 1,92,500 रुपये म्हणजेच 1.92 लाख रुपये गुंतवावे लागतील. यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला साधारण 16,042 रुपये गुंतवणूक करावी लागेल.
स्ट्रॅटेजी क्रमांक दोन
समजा तुम्ही 30 वर्षांचे आहात आणि तुमच्या निवृत्तीसाठी आणखी 19 वर्षे बाकी आहेत. त्यानुसार तुम्हाला वयाच्या 50 व्या वर्षी पाच कोटी रुपयांचा फंड उभा करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला साधारण 4 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ही गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला महिन्याला 33,333 रुपयांची सेव्हिंग करावी लागेल. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार साधारण एक लाख रुपये असेल तर त्याला त्याच्या पगाराची 30 टक्के रक्कम गुंतवणुकीसाठी बाजूला काढून ठेवावी लागेल. 30 वर्षांपासून गुंतवणुकीला सुरुवात करणे हा थोडा उशिराने घेतलेला निर्णय समजला जातो. त्यामुळेच मासिक बचतीची ही रक्कम जास्त वाटू शकते.
स्ट्रॅटेजी क्रमांक तीन
तुम्ही सध्या 35 वर्षांचे असाल आणि तुम्हाला तुमच्या वयाच्या 50 व्या वर्षी 5 कोटी रुपयांचा फंड हवा असेल तर तुमच्याकडे बचतीसाठी आणखी 14 वर्षे शिल्लक आहेत. म्हणजेच तुम्हाला 50 व्या वर्षांपर्यंत 5 कोटी रुपयांचा फंड उभा करायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक वर्षाला तुम्हाला 8,85,000 रुपयांची बचत करावी लागेल. म्हणजेच तुम्हाला महिन्याला 73,750 रुपयांची सेव्हिंग करावी लागू शकेल. अशा प्रकारे सेव्हिंग केल्यास तुम्ही 14 वर्षांत 8.85 लाख रुपयांची बचत कराल. अशा प्रकारची सेव्हिंग पद्धत वापरून 10 टक्क्यांच्या परताव्याच्या हिशोबाने तुम्ही वयाच्या 50 वर्षांपर्यंत पाच कोटी रुपयांचा फंड उभा करू शकता.
10 टक्क्यांचा परतावा का गृहित धरला?
गुंतवणूक क्षेत्रात 10 टक्क्यांचा परतावा हा बेंचमार्क समजला जातो. तुम्ही कोणत्या माध्यमात गुंतवणूक करत आहात. त्याची जोखीम किती आहे. तुम्ही नेमकी कशाची गुंतवणूक करत आहात, किती वर्षांची गुंतवणूक करत आहात? या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुमच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यात बदल घडू शकतात. त्यामुळेच साधारण 10 टक्के रिटर्न्सचा बेंचमार्क गृहित धरला जातो.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
मुकेश अंबानींनाही टाकलं मागे! 'हा' दिग्गज उद्योगपती ठरला भारताचा सर्वोच्च धनिक, संपत्ती तब्बल...