Saving Formula : सततच्या वाढत्या महागाईमुळे (Inflation) मध्यमवर्गीयांचं बजेट बिघडले आहे, त्यामुळे पैशांची बचत करणं कठीण झालेय. त्यामुळे अनेकांना आपल्या आर्थिक भवितव्याची चिंता आहे. घर खर्च, शाळा, रुग्णालय, घराचा हप्ता यामध्ये अनेकजण चिंतेत आहेत. काही जणांना खायचे काय आणि  वाचवायचे काय हा त्यांचा प्रश्न सतावत आहे.  महागाईच्या या काळात सेव्हिंगचा फॉर्मुला सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही सहज बचत करू शकाल. हे सूत्र 50:30:20 म्हणून ओळखले जाते. यालाच सोप्या भाषेत सांगायचे तर तुमच्या उत्पन्नाचे तीन भाग केले आहेत.


पगारावर हा फॉर्मुला अप्लाय करा 


महिनाभर राबल्यानंतर पगाराची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते. पण सेव्हिंग होत नाही. पण त्यावर 50:30:20 चा फॉर्म्युला लावता येईल. जर तुम्ही व्यापारी असाल, तर तुमच्या संपूर्ण मासिक उत्पन्नावर 50:30:20 हा फॉर्म्युला लागू होईल, म्हणजेच तुम्ही सर्व खर्च करूनही तुमच्या बचतीसाठी पैसे वाचवू शकता. 50:30:20 या फॉर्मुल्याबाबत उदाहरणासह जाणून घेऊयात... 


पगारातील 50 टक्के भागात करा ही कामं - 


समजा, दरमहा तुमचा पगार 40,000 रुपये आहे. पण पैसे कसे वाचवायचे हे तुम्ही ठरवू शकत नाही? त्यासाठी आधी 50:30:20 फॉर्मुला समजून घेऊ. तुमच्या कमाईला तीन भागात विभागण्याची गरज आहे. घरखर्च, घरभाडे/EMI आणि शिक्षण यासह अत्यावश्यक गरजांवर पहिले 50 टक्के खर्च करा. म्हणजेच 20 हजार रुपये तुम्ही घरखर्च, घरभाडे आणि शिक्षणासाठी खर्च करु शकता.  


30 टक्केंमध्ये या गरजा पूर्ण करा - 


तुमच्या उत्पन्नातील 30 टक्के रक्कम इच्छेशी संबंधित गोष्टींवर खर्च करा.. त्यामध्ये बाहेर फिरायला जाणे, जेवायला जाणे, चित्रपट पाहणे, गॅजेट्स, कपडे, कार, बाईक याचा समावेश असेल. त्याशिवाय रुग्णालयातील खर्चही यामध्ये येतो. म्हणजेच, तुमच्या पगारातील 30 टक्के रक्कम जीवनशैलीशी संबंधित खर्चासाठी वापरु शकता.  तुमचा पगार 40 हजार रुपये असेल तर 12 हजार रुपये तुम्ही यामध्ये खर्च करु शकता.  


20 टक्के रक्कम गुंतवणुकीत टाका - 


आता उरलेली 20 टक्के रक्कम तुम्ही गुंतवणुकीत टाका... म्हणजे, म्युच्युअल फंडा, एसआयपीए, बाँड, आरडी, एफडी अथवा अन्य... ठिकाणी तुम्ही तुमच्या पगारातील 20 टक्के रक्कम गुंतवू शकता. समजा तुमचा पगार 40 हजार रुपये आहे, तर त्याची 20 टक्के रक्कम म्हणजेच, 8 हजार रुपये महिन्याला गुंतवणूक कऱण्याची गरज आहे. जर तुम्ही महिन्याला आठ हजार रुपयांची गुंतवणूक केली तर वर्षाला लाख रुपये सेव्हिंग करु शकता. जर तुम्हाला सुरुवातीला 20 टक्के रक्कम वाचवण्यात अडचण येत असेल तर तुमच्या गरजेसाठी कोणत्या गोष्टी आहेत आणि अनावश्यक खर्च कोणता आहे याची यादी तयार करा. फालतू खर्च त्वरित थांबवा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला महिन्यातून 4 दिवस बाहेर खाण्याची सवय असेल तर ती महिन्यातून दोनदा कमी करा. महागडे कपडे घेणे टाळा. क्रेडिट कार्डच्या वापरावरही नियंत्रण ठेवा. तुमच्या पगारातील 20 टक्के रक्कम सेव्हिंगमध्ये टाकाच..