मुंबई : एकीकडे आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापला असताना दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पक्षात डावललं जात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी पक्षात छगन भुजबळ एकदा नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यातच छगन भुजबळ यांनी मुंबईत तातडीने समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक बोलावल्याची माहिती होती. वांद्रेमधील एमईटी संस्थेच्या संकुलात ही बैठक झाली. मात्र, ही समता परिषदेची बैठक नसून राज्यातील विविध भागातील ओबीसी बांधव (OBC) भेटीसाठी आले होते, असे भुजबळ यांनी सांगितले. विशेष म्हणजे या बैठकीदरम्यान छगन भुजबळ यांनी ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. 


मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये यासाठी जालन्यातील वडीगोद्री गावात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे तर मागील 4 दिवसांपासून मंगेश ससाणे यांचे पुण्यात उपोषण सुरु आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची लेखी हमी सरकारने द्यावी, या प्रमुख मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू आहे. चार-पाच दिवसांपासून उपोषण सुरू असल्याने उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज छगन भुजबळ यांनी बैठक घेतल्यानंतर भूमिका स्पष्ट केली.   


''राज्यातील काही ओबीसी बांधवांनी भेटण्याची विनंती केली होती. त्यानुसार, राज्याच्या विविध भागांतील ओबीसी बांधवांना भेटून सध्याच्या राजकीय व सामाजिक विषयावर चर्चा केली. आमचे हाके जालन्यात उपोषणाला बसले आहेत, पुणे आणि भगवान गडाच्या पायथ्याशीही आमचे काहीजण उपोषणाला बसले आहेत. नाशिकमध्येही काहीजण बसले होते, त्यांना आम्ही थांबवलं. याच अनुषंगाने चर्चा झाली, आम्ही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही स्वत: अभ्यास केला आहे, दोन तीन-दिवस सुट्टी असल्यामुळे आमच्या काही वकिलांची भेट झाली नाही. उद्या परवापर्यंत आम्हीही सगळं वकिलांशी दाखवून घेऊ, सगेसोयरे या पेपर्सवरही चर्चा करू, जिथे ओबीसीवर अन्याय होत असतील किंवा सुधारणा करण्याची गरज असेल तिथं सुधारणा करू,'' असे आश्वासन छगन भुजबळ यांनी दिले. 


भुजबळांचा आंदोलनकर्त्यांना शब्द


''आत्मसमर्पणाचं वगैरे तिथपर्यंत जाण्याची गरज नाही, त्यांना समजावून सांगा. आपण थोडी वाट पाहायला हवी, आणि जर वकिलांनी सांगितलं की, ह्या गोष्टी अन्याय करणाऱ्या आहेत, आणि जर सरकार ऐकत नसेल तर मीही तुमच्यासोबत आंदोलनात उतरतो, माझीही तयारी आहे'' असा शब्द छगन भुजबळ यांनी आंदोलनकर्त्यांना दिला आहे. मात्र, अगोदर सर्व गोष्टी तपासून पाहुयात, असेही ते म्हणाले. 


जातनिहाय जनगणना करावी - भुजबळ


भारत सरकारने जातनिहाय जनगणना केली तर आम्हाला आनंदच होईल. सगळेच खुश होतील, खरोखरच किती ओबीसी आहेत हेही कळेल. जातनिहाय आकडेवारीचा हिशोब देखील यामुळे लागेल. त्यामुळे, केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना केली पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. 


हेही वाचा


विधानसभेसाठी मोदी-शाहांचा प्लॅन, महाराष्ट्रात प्रभारी-सहप्रभारीपदी केंद्रातील दोन खास मंत्र्यांची नियुक्ती