Palm Oil Price Increased: रशिया (Russian) आणि युक्रेनच्या (Ukraine) युद्धाचा परिणाम आता थेट भारतातील (India) सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरावर पडणार आहे. भारत याच दोन देशातून मोठ्या प्रमाणात सूर्यफूल तेल आयात करतो. मात्र या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे यांच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फायदा पामतेल उत्पादकांना होणार आहे. दोन्ही देशांमधील भीषण युद्धामुळे तेथून सूर्यफूल तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला असून विश्लेषकांच्या मते युद्ध संपल्यानंतरही ही स्थिती नजीकच्या काळात लगेच सुधारणार नाही. या युद्धाचा परिणाम दोन्ही देशांतील सूर्यफुलाच्या लागवडीवर दीर्घकाळ होणार असून उत्पादन कमी झाल्यास पुरवठा आणखी धोक्यात येईल.  

  


पामतेलाचा वाटा वाढेल - भाव वाढतील


भारत मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलाची आयात करतो. यामध्ये 60 टक्क्यांहून अधिक पाम तेलाचा वाटा आहे. सूर्यफूल तेलाचा बाजार कमी झाल्यामुळे पामतेलच्या मागणीत वाढ झाली आहे. भारत 2.5 दशलक्ष टनांहून अधिक सूर्यफूल तेल आयात करतो. सूर्यफूल तेलाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे पामतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.


भारताला सूर्यफूल तेलाचा पुरवठा ही झाला कमी


जियोजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन विश्लेषक विनोद टीपी म्हणाले की, युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे सूर्यफूल तेलाच्या आयातीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्याचा समतोल बिघडला आहे. भारत हा सूर्यफूल तेलाचा प्रमुख आयातदार आहे. भारत सूर्यफूल तेलाच्या आयातीसाठी युरोप आणि अर्जेंटिना यांच्यावर अवलंबून राहू शकत नाही, कारण हे देश स्वतःच या तेलाचे सर्वात मोठे ग्राहक आहेत.


सोयाबीन तेलाच्या किंमत वाढ 


सूर्यफूल तेलाचा तुटवडा आणि पाम तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम सोयाबीन तेलावर झाला असून युद्ध सुरू झाल्यापासून यांच्या किमती 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ब्रोकरेज फर्म कोटक सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, दक्षिण अमेरिकन देशांमध्ये सोयाबीन उत्पादनाचा अंदाज कमी झाल्यामुळे आणि इंडोनेशियामध्ये पाम तेलाच्या वाढत्या देशांतर्गत वाटपामुळे पाम तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम हा भारतातील सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरावर होणार आहे. यासोबतच घरखर्चाचे बजेट देखील कोलमडणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: