Beed News : बीडच्या धारूर शहरांमध्ये असणाऱ्या ऐतिहासिक किल्ल्याच्या डागडुजीचे काम सध्या सुरू आहे.. मात्र हे काम थातूरमातूर पद्धतीने करण्यात येत असून या निकृष्ट काम करणार्‍या एजन्सी व संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी इतिहासप्रेमी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्यासमोर मूक आंदोलन केले. या आंदोलनाची तात्काळ दखल न घेतल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.


मागच्या काही दिवसांपासून धारूरच्या ऐतिहासिक किल्ल्याचे वैभव कायम राहावे यासाठी दुर्गप्रेमी आठवड्यातील एक दिवस या किल्ल्याच्या स्वच्छतेचे काम करतात. याच स्वच्छता दरम्यान या किल्ल्यातील दगडी दारूगोळे हे अस्ताव्यस्त पडले होते ते या दुर्गप्रेमींनी एकत्रित करून एका खोलीमध्ये ठेवले होते. मात्र, त्या दगडी दारूगोळ्याची सुद्धा चोरी झाल्याचं उघड झालं होतं.


धारूरच्या ऐतिहासिक किल्ला वाचावा अशी मागणी करत या किल्ल्यासमोर एक दिवसीय मूक आंदोलन करण्यात आलं. या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी सात कोटी रुपये निधी पुरातत्व विभागाने दिला आहे. या कामाला सुरुवात झाली आहे मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. धारूरच्या किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त मिळाले पाहिजे अशी भावना दुर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे. ऐतिहासिक महादुर्गांची होणारी दुर्दशा याला पुरातत्त्व विभाग जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. येत्या 15 दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. 



>> काय आहेत मागण्या  



  • कंत्राटदाराला निकृष्ट कामाबद्दल काळ्या यादीत टाकावे

  • तटबंदीचे निकृष्ट बांधकाम करण्यात आले त्याची चौकशी करण्यात यावी

  • किल्ल्याला कायमस्वरूपी पहारेकरी नेमावा 

  • बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा महादुर्ग वाचवा

  • महादुर्ग/ धारूरचे प्रवेशद्वार,तटबंदी,बुरुज,शिलालेख,तिफगोळे,तलाव,पाण्याच्या टाके,सैनिक खोल्या,हमामाखाना आणि बारव अश्या या ऐतिहासिक वास्तू वाचविण्याची गरज..

  • संचालक आणि सहाय्य संचालक यांच्या मनमानी  कारभारावर मुख्यमंत्र्यानी तात्काळ कारवाई करावी.