Russia Ukraine War Impact on India : रशियाने युक्रेनवर अखेर हल्ला केला. या युद्धाचे आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारणावर परिणाम होणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कडाडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 101 डॉलर प्रति बॅरल इतके झाले आहे. भारताच्या अर्थकारणावर याचा परिणाम झाला आहे.
महागाई वाढणार
कच्च्या तेलाच्या दराने उच्चांक गाठला असल्याचे इंधन दरवाढ होण्याची शक्यता आहे. त्याच्या देशात महागाईचा आगडोंब उसळू शकतो. इंधन दरात 10 मार्चनंतर वाढ होण्याची शक्यता आहे.
चलन विनिमय दरावर परिणाम
रशिया-युक्रेन युद्ध सुरू राहिल्यास चलन विनिमय दरावर परिणाम होणार असल्याचे म्हटले जात आहे. रुपयाचा दर घसरल्याने व्यापार खर्च वाढू शकतो.
धातू महाग झाल्यास ऑटो क्षेत्रावर परिणाम
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम मेटल सेक्टरवरही दिसून येणार असून भारताला रशियाकडून मोठ्या प्रमाणात धातूचा व्यापार होतो. याचा फायदा वाहन क्षेत्राला होतो. युद्धामुळे धातूच्या आयतीवर निर्बंध लागू झाल्यास वाहन क्षेत्राला फटका बसण्याची भीती आहे.
रशियासोबतच्या व्यापारातील आयात-निर्यात
वर्ष 2021 मध्ये, भारताने रशियाला एकूण 550 दशलक्ष डॉलर्सची निर्यात केली आहे. रशियाकडून 260 दशलक्ष डॉलर्स आयात व्यापार झाला आहे.
रशियाकडून गॅस आयात
रशियाकडून 0.20 टक्के गॅस आयात केला जातो. गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने (GAIL) नुकतेच LNG साठी GazProm सोबत करार केला आहे. या अंतर्गत 20 वर्षांसाठी दरवर्षी 2.5 दशलक्ष टन आयात करण्याचा करार करण्यात आला आहे. अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांमध्ये तेल आणि वायूच्या निर्यातीवर बंदी समाविष्ट नाही आणि रशिया तेल आणि वायूची निर्यात सुरूच ठेवणार आहे. ही काहीशी दिलासा देणारी बाब आहे.
भारताच्या संरक्षण सज्जतेवर परिणाम
भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र खरेदी करतो. भारतीय लष्करात जवळपास 60 टक्के शस्त्रे ही रशियन बनावटीची आहेत. त्याशिवाय रशियाकडून एस-400 ही क्षेपणास्त्रविरोधी एअर डिफेन्स सिस्टीम भारताला मिळणार आहे. युद्ध पेटल्यास रशियावर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत रशियाकडून भारताला होणारा शस्त्र पुरवठा खंडित होऊ शकतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या: