Rupee Vs Dollar: डॉलरच्या तुलनेत रुपयाची आज ऐतिहासिक घसरण (Rupee Fall) झाली. रुपयात 90 पैशांची घसरण नोंदवण्यात आली. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने (Fedaral Reserve) व्याज दरात वाढ केल्याची घोषणा केली. त्याच्या परिणामी जागतिक बाजारात डॉलर आणखीच वधारला. आज चलन बाजार बंद झाला तेव्हा रुपया डॉलरच्या तुलनेत 80.95 रुपयांवर बंद झाला. अमेरिकन डॉलर निर्देशांकाने मागील दोन दशकांचा उच्चांक गाठला. अमेरिकन डॉलरने 111.72 चा स्तर गाठला. 


डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून डॉलरची विक्री करण्यात आली असल्याची चर्चा आहे. 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक बाजारातील घडामोडी पाहता रुपयाच्या घसरणीने भारताला फार चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.


भारतीय रिझर्व्ह बँकेने रुपयाची घसरण रोखण्यासाठी काही प्रयत्न केले का, याबाबत जाणून घेण्यासाठी रॉयटर्सने ट्रे़डर्ससोबत संपर्क साधला होता. मात्र,  ट्रेडर्सकडून याबाबत काहीही पुष्टी करण्यात आली नाही. रुपयांची घसरण थांबवण्यासाठी आरबीआयने फारशी आक्रमक पावले उचलली नसतील असा अंदाज काही ट्रेडर्सने व्यक्त केला. 


अमेरिकेतील वाढती महागाई रोखण्यासाठी फेडरल रिझर्व्हने 75 बीपीएसची वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अमेरिकेतील व्याज दरात 0.75 टक्क्यांची वाढ झाली. फेडरल रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा व्याज दरात वाढ केली आहे. आगामी बैठकांमध्येही व्याज दरात वाढ करण्याचे संकेत फेडरल रिझर्व्हने दिले आहेत. वर्ष 2023 पर्यंत व्याज दर हा 4.6 टक्क्यांपर्यंत होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भविष्यात जागतिक चलनबाजारात डॉलर आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण कायम राहिल्यास भारताचा आयात खर्च आणखी वाढण्याची भीती आहे. इंधन दरावर याचा परिणाम होण्याची भीती असून महागाईचा भडका उडू शकतो. 


शेअर बाजारात घसरण


आज शेअर बाजारातही घसरण दिसून आली. सेन्सेक्समध्ये 337 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. तर,  निफ्टीमध्ये 88 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 0.57 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,119 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.50 अंकांची घसरण होऊन तो 17,629 अंकांवर स्थिरावला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: