Inflation Rate : भारताच्या किरकोळ महागाई दरात  (Retail Inflation Rate) किंचित घट नोंदवण्यात आली. जून महिन्यात महागाई दर 7.01 टक्के इतका नोंदवण्यात आला. मे महिन्यात हा महागाई दर 7.04 टक्के इतका होता. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये महागाई दरात 0.3 टक्क्यांनी घट झाली आहे. सलग सहाव्यांदा महागाई दर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) निर्धारीत केलेल्या लक्ष्याहून अधिक आहे. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर 7.79 टक्के इतका नोंदवण्यात आला होता. खाद्य महागाई दर  जून महिन्यात 7.75 टक्के इतका राहिला. मे महिन्यात हा दर 7.97 टक्के इतका होता. 


रिझर्व्ह बँकेने 2022-23 मधील महागाई दर  6.7 टक्के इतका राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्याआधी हा दर 5.7 टक्के इतका होता. सरकारने आरबीआयला किरकोळ महागाई दर 4 टक्क्यांवर 2 टक्क्यांच्या मार्जिनसह ठेवण्यास सांगितले आहे. आरबीआयने किरकोळ महागाई दराचे लक्ष्य सहा टक्के इतके ठेवले.


खाद्य महागाई दरात घट


CPI आधारीत महागाई दर मे महिन्यात 7.04 टक्के इतका होता. तर, एप्रिल महिन्यात 7.79 टक्के इतका नोंदवण्यात आला. मार्च महिन्यात 6.95 टक्के, फेब्रुवारीमध्ये 6.07 टक्के आणि जानेवारी महिन्यात 6.01 टक्के इतका दर होता. जून महिन्यात खाद्य महागाई दर 7.75 टक्के इतका होता. हा दर मागील महिन्यात 7.97 टक्के इतका होता. 


सरकारकडून उत्पादन शुल्कात कपात 


सरकारने नागरिकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी  इंधनावरील करात कपात केली होती. मे महिन्यात पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर काही राज्यांनीदेखील व्हॅट दरात कपात केली.  त्यानंतर महागाईत किंचित घट झाल्याचे दिसून आले. 


महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआयने रेपो दरात वाढ केली होती. जून महिन्यात आरबीआयने रेपो दरात वाढ केली आहे. त्यानंतर देशातील बँकांनी व्याजदरात वाढ केली. जून महिन्यात 0.50 टक्क्यांनी रेपो दर वाढवण्यात आला. त्यानंतर रेपो दर हा 4.90 टक्के इतका झाला आहे.