YES Bank and ICICI Bank नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सोमवारी खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर मोठी कारवाई केली. आरबीआयनं येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेला नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी दोषी ठरवलं.दोन्ही बँका दोषी आढळल्यानं आरबीआयनं मोठा आर्थिक दंड ठोठावला. आरबीआयनं येस बँकेला 91 लाख तर आयसीआयसीआय बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड केला आहे.  


येस बँकेला दंड का करण्यात आला? 


आरबीआयनं सोमवारी माहिती देताना म्हटलं की दोन्ही बँका काही मार्गदर्शक तत्वांचं पालन करत नव्हत्या. आरबीआयच्या माहितीनुसार येस बँकेला ग्राहक सेवा आणि अतंर्गत कार्यालयीन  खात्यांशी संबंधित नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी दंड ठोठावण्यात आला.  


आरबीआयच्या माहितीनुसार येस बँकेनं  झिरो बॅलन्स खात्यामध्ये किमान रक्कम शिल्लक नसल्यानं शुल्क वसूल केलं होतं. आरबीआयला 2022  च्या दरम्यान येस बँकेनं असा प्रकार अनेकदा केल्याचं आढळून आलं. बँकेनं फंड पार्किंग आणि ग्राहक व्यवहारांना रुट करण्यासारख्या सारख्या चुकीच्या कारणांसाठी ग्राहकांच्या नावावर काही अतर्गंत खाती उघडली आणि चालवली होती, असं आढळून आलं. 


आयसीआयसीआय बँकेला एक कोटींचा दंड का करण्यात आला?  


आरबीआयनं येस बँकेला 91 लाख तर आयसीआयसीआय बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला. आयसीआयसीआय बँकेनं अपुऱ्या चौकशीच्या आधारे काही प्रकरणांमध्ये कर्ज दिली. यामुळं बँकेला वित्तीय संकटाचा सामना करावा लागला. आरबीआयला चौकशीमध्ये आयसीआयसी बँकेच्या कर्ज मंजुरी प्रक्रियेत काही चुका आढळून आल्या होत्या. बँकेलने  काही प्रकल्पांची व्यवहार्यता आणि कर्ज परतफेड करण्याची क्षमता  याचं विश्लेषण न करता  कर्ज दिल्याचं समोर आलं होतं. 


येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेची शेअर बाजारातील स्थिती


बीएसईवर येस बँकेचा शेअर सोमवारी 0.010 रुपयांनी वाढून 23.04 रुपयांवर बंद झाला.आयसीआयसीआय बँकेचा शेअर 2.10 रुपयांनी घसरुन 1129.15 रुपयांवर बंद झाला.  


दरम्यान, आरबीआयकडून नियमितपणे बँकांच्या कामकाजाचा आढावा घेत नियमांंचं उल्लंघन करणाऱ्या बँकांना दंड आकारण्यात येतो. बँकांना नियमांचं उल्लंघन न करण्याच्या सूचना देत आर्थिक दंड आकारण्यात येतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील सर्व बँकाचं  नियमन करते. 


संबंधित बातम्या : 


कधी सोन्याचा दर गगनाला, तर कधी घसरण; चार दिवसांत 2500 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नेमकं कारण काय?


50 लाखांचं घर घ्या, तेही फुकटात! 'हा' फॉर्म्यूला वापरल्यास सगळे पैसे परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर!