Nirmala Sitharaman: अनिवासी भारतीयांचे (NRI) भारतात पैसे पाठवण्याचं योगदान मोठं आहे. त्यांचं हेच योगदान अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी अधोरेखित केलं आहे. यासोबतच 2022 या वर्षाभरात परदेशात राहणारे म्हणजेच अनिवासी भारतीयांनी देशात पाठवलेले पैसे सुमारे 100 अब्ज डॉलर्स असून ते एका वर्षात 12 टक्क्यांनी वाढले आहेत अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितली. सीतारामन मध्य प्रदेशात बोलत होत्या. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे


मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील प्रवासी भारतीय दिवस (PBD) अधिवेशनादरम्यान झालेल्या एका सत्रात बोलताना त्यांनी या विषयाला हात घातला. यावेळी अनिवासी भारतीयांना "भारताचे खरे राजदूत" म्हणायला हवं असं प्रतिपादन सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केलं. याशिवाय अनिवासी भारतीयांनी भारतातील उत्पादने आणि सेवा शक्यतो वापरण्याचं आवाहन त्यांनी केले जेणेकरुन देशाच्या वैयक्तिक ब्रँडचा जगभरात प्रचार केला जाऊ शकतो. 


याच कार्यक्रमात बोलताना “चीन प्लस वन” धोरणानंतर जग आता “युरोपियन युनियन (EU) प्लस वन” धोरणाबद्दल बोलत असल्याची बाब अधोरेखित केली. चीन आणि EU व्यतिरिक्त ते त्यांचे कारखाने सुरू करू शकतील असा देश म्हणून सरकार भारताला बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर जोरदारपणे सादर करत आहे. भारतीय डायस्पोरांनी देशातील लहान आणि मोठ्या व्यावसायिकांसोबत भागीदारी केली पाहिजे जेणेकरुन येत्या 25 वर्षांत स्वातंत्र्याच्या 'अमृत काल' दरम्यान अनिवासी भारतीयांच्या उद्योजकीय कौशल्यांचा उपयोग करता येईल."परदेशातून स्थलांतरित झालेल्या भारतीयांनी पाठवलेला रेमिटन्स 2022 या वर्षासाठी सुमारे 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा आहे. हा येणार्‍या सर्वाधिक रेमिटन्सपैकी एक आहे," असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. 2021 च्या तुलनेत टक्के हे प्रमाण 12 टक्क्यांनी वाढले आहे.  


साथीच्या रोगानंतरच्या एका वर्षाच्या आत, लोकांना वाटले की भारतीय कामगार पुन्हा परदेशात परत जाणार नाहीत, ते केवळ परत गेले नाहीत तर खूप उपयुक्त रोजगारासाठी गेले आणि पैसे पाठविणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. एका वर्षात 12 टक्के वाढ झाली आहे. 


माहिती तंत्रज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल्स, सेमीकंडक्टर डिझायनिंग, फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग आणि इतर क्षेत्रातील भारतीय व्यावसायिकांच्या वर्चस्वाचा दाखला सीतारामन यांनी दिला. देश ज्ञान आणि प्रगतीचे जागतिक केंद्र बनत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत कालमध्ये, एक महत्त्वाकांक्षी भारत चार गोष्टीवर लक्ष केंद्रित करेल ज्यात पायाभूत सुविधा, गुंतवणूक, नाविन्य आणि समावेश यांचा समावेश आहे राहिल असं सीतारामन यांनी सांगितलं.