Reliance Industries Share Price: मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) गेल्या तिमाहीचे रिझल्ट्स समोर आले आहेत. हे रिझल्ट्स गेल्या आठवड्यात 19 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आले. त्यानंतर ब्रोकरेज फर्म एलारा सिक्युरिटीजनं (Elara Securities) रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकची टार्गेट प्राईज (Reliance Industries Stock Target Price) वाढवली आहे. इलारा सिक्युरिटीजनं गुंतवणूकदारांना रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर (Reliance Industries Shares) खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या लेव्हलपासून सुमारे 24 टक्क्यांच्या उसळीसह रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आलाय.
एलारा सिक्युरिटीजनं आपल्या अहवालात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या सध्याच्या पातळीपेक्षा 24 टक्के जास्त म्हणजे, 3354 रुपयांपर्यंतचे लक्ष्य गाठण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मनं यापूर्वी 3194 रुपयांचं उद्दिष्ट दिलं होतं, ते आता 3354 रुपये करण्यात आलं आहे. 20 जानेवारी 2024 रोजी शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, निकाल जाहीर झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक 0.79 टक्क्यांच्या घसरणीसह 2713 रुपयांवर बंद झाला. एलारा सिक्युरिटीजच्या आधी विदेशी ब्रोकरेज हाऊस जेफरीजनंही गुंतवणूकदारांना रिलायन्सचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेफरीजनं आपल्या अहवालात म्हटलं आहे की, रिलायन्सचा शेअर 21 टक्क्यांच्या उडीसह 3125 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
शुक्रवारी, 19 जानेवारी रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजनं त्यांचे गेल्या तिमाहीतील निकाल जाहीर केले. कंपनीनं ऑईल अँड गॅस, रिटेल आणि टेलिकॉम या तिन्ही वर्टिकलमध्ये भरारी घेतल्याचं या निकालांमधून पाहायला मिळत आहे. 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्सचा एकूण महसूल 248,160 कोटी रुपये होता, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या त्याच तिमाहीत 240,532 कोटी रुपये होता. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नेट प्रॉफिट 19,641 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत 17,706 कोटी रुपये होता. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 44,678 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 38,286 कोटी रुपये होता.
तिसर्या तिमाहीत रिलायन्स रिटेलचा एकूण महसूल 83 हजार 063 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 67 हजार 623 कोटी रुपये होता. कंपनीला 3165 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. Jio Platform Limited चा महसूल 32 हजार 510 कोटी रुपये होता आणि नफा 5445 कोटी रुपये होता जो गेल्या वर्षी 4881 कोटी रुपये होता.
(टीप : वर देण्यात आलेला मजकूर केवळ माहितीसाठी देण्यात आलेला आहे. बाजारात केलेली कोणतीही गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)