मुंबई : देशातील सर्व शासकीय खासगी बँका, वित्तीय संस्थांवर भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) करडी नजर असते. देशातील कोणत्याही बँकेने नियमांचे उल्लंखन केल्यास आरबीआय कायद्यानुसार कारवाई करते. दमरम्यान, आयडीएफसी फस्ट बँकेवर (IDFC First Bank) आरबीआयने मोठी कारवाई केली आहे. या बँकेसह एलआयसी हाऊसिंग फायनान्सवरही (LIC Housing Finance) आरबीआयने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बँकेच्या ग्राहकांवर काही परिणाम पडणार का? असे विचारले जात आहे. 


आरबीआयने नेमकी काय कारवाई केली? 


भारतीय रिझर्व्ह बँकेने आयडीएफसी फस्ट बँकेला एक कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. यासह एलआयसी हाऊसिंग फायनान्स या फायनान्स कंपनीलाही 49.70 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयडीएफसी फस्ट बँकेने नियम आणि बंधनांचे उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसे स्पष्टीकरण आरबीआयने दिले आहे. 


कायद्याचे पालन न केल्यामुळे फटका


आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार गैर बँकिंग वित्तीय कंपनी- हाउसिंग फायनान्स कंपनी (रिझर्व्ह बँक) दिशानिर्देश-2021 या कायद्यातील काही तरुतुदींचे पालन न केल्यामुळे एलआयसी हाऊसिंग फायनान्स या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. याआधी आरबीआयने एसबीआय आणि एचडीएफसी बँकेवरही अशा प्रकारची कारवाई केली होती. 


चार एनबीएफसींचे रजिस्ट्रेशन रद्द 


यासह आरबीआयने चार मोठ्या बिगर बँकिंग वित्तीय संस्थांचे (एनबीएफसी) नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले आहे. यामध्ये कुंडल्स मोटार फायनान्स, नित्या फायनान्स, भाटिया हायर परचेस आणि जीवनज्योत डिपॉझिट्स अँड अॅडव्हान्सेस यांचा समावेश आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे आता या संस्थांना आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. दुसरीकडे आरबीआयने ग्रोइंग अपॉर्च्यूनिटी फायनान्स (इंडिया), इनवेल कमर्शियल, मोहन फायनान्स, सरस्वती प्रॉपर्टिज अँड क्विकर मार्केटिंग या पाच एनबीएफसींना त्यांचीं नोंदणी प्रमाणपत्रं परत करण्यात आली आहेत. 


ग्राहकांवर काय परिणाम होणार? 


आयडीएफसी फस्ट बँकेला थेट एक कोटी रुपयांचा दंड थोपटण्यात आल्यामुळे या बँकेच्या ग्राहकांनाही आर्थिक फटका बसणार का? असे विचारले जात आहे. मात्र आरबीआयने घेतलेल्या निर्णयाचा ग्राहकांशी काहीही संबंध नाही. याचा फटका ग्राहकांना नव्हे तर बँकेला बसणार आहे. आरबीआयच्या या निर्णयाला ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नाही. ग्राहकांच्या हिताचे रक्षण व्हावे, भविष्यात अडचणी निर्माण होऊ नयेत, म्हणूनच आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. 


हेही वाचा :


आता बँकेत जाण्याची कटकट मिटणार! UPI च्या मदतीने पैसे खात्यात जमा करता येणार; जाणून घ्या संपूर्ण माहिती


'या' शेअरने वर्षभरात दिले तगडे रिटर्न्स, तब्बल 271 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या A टू Z माहिती!


एकीकडे सोन्याचा दर 70 हजारांपार, दुसरीकडे आरबीआयकडून कित्येक टन सोन्याचा साठा; नेमकं धोरण काय?