Online loan : ऑनलाईन कर्ज देऊन अनेकांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु, या फसवणुकीतून आता सुटका होण्याचा अंदाज आहे. कारण रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया लवकरच डिजिटल कर्ज प्लॅटफॉर्मसाठी नियामक संरचना घेऊन येणार आहे. यामुळे अनेक अनधिकृत आणि बेकायदेशीरकृत्यांना आळा बसेल असे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे.
डिजिटल कर्ज देणार्या अॅप्सच्या काही ऑपरेटर्सच्या छळामुळे कर्जदारांच्या कथित आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.
या विषयी माहिती देताना दास म्हणाले, "लवकरच आम्ही एक व्यापक नियामक संरचना घेऊन येत आहोत, जी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे कर्ज देण्याच्या संदर्भात आम्हाला भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम असेल. ज्यापैकी बरेच अनधिकृत, नोंदणीकृत नसलेल्या आणि बेकायदेशीर मंडळींना चाप बसणार आहे ”
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) आयोजित केलेल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'आझादी का अमृत महोत्सवा'चा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या आयकॉनिक वीक सोहळ्यात शक्तिकांत दास बोलत होते. अनधिकृत डिजिटल कर्ज देणार्या अॅप्समधून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांनी कोणत्याही समस्येच्या बाबतीत स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन यावेळी दास यांनी केलं.
बहुतेक डिजिटल कर्ज देणारी अॅप्स मध्यवर्ती बँकेकडे नोंदणीकृत नाहीत आणि ते स्वतःच ऑपरेट करतात. ज्यावेळी ग्राहकांकडून तक्रार येते त्यावेळी सेंट्रल बँक अशा नोंदणी नसलेल्या अॅप्सच्या ग्राहकांना स्थानिक पोलिसांकडे जाण्याचे निर्देश देतात.
"ऑनलाईन कर्ज देणारी अनधिकृत अॅप वापरणाऱ्या सर्वांना माझी विनंती आहे की, अॅप RBI नोंदणीकृत आहे की नाही हे प्रथम तपासा. जर अॅप आरबीआय नोंदणीकृत असेल तर, केंद्रीय बँक कोणत्याही गैरवर्तनाच्या बाबतीत ताबडतोब कारवाई करेल, असे दास यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या