RBI Repo Rate: : रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण जाहीर केले असून रेपो दरात कोणताही बदल केला नाही. पतधोरणात रेपो दरामध्ये कोणताही बदल न करता तो 4 टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे तर रिव्हर्स रेपो दर 3.35 इतका ठेवण्यात आला आहे.महागाई दर आणि वाढत्या कच्च तेलाच्या किंमती पाहता, देशांतर्गत चलनवाढीच्या स्थितीबाबत मध्यवर्ती बॅंकेच्या आकलनाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. आरबीआयकडून रिर्व्हस रेपो दरता बदल केले जातील असे म्हटले जात होते. रिझर्व्ह बँकेने येत्या आर्थिक वर्षात विकास दर 7.8 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला.
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी म्हटले की, जागतिक बाजारपेठेत कोरोना महासाथीच्या आजारामुळे अनेक आव्हाने समोर आली. भारतालादेखील अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी आरबीआयनेदेखील मोठी भूमिका बजावली आहे. आता कोरोना महासाथीला पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सलग 10 व्यांदा व्याज दरात कोणताही बदल नाही
डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले होते. त्यावेळी सलग 9 व्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. रिझर्व्ह बँकेने मॉनिटरी पॉलिसीमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला होता. आताही रेपो दर कायम ठेवण्यात आला आहे.
कच्च्या तेलाचे दर वधारल्याने चिंता
मागील काही महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर वाढत आहे. अनेक देशांमध्ये महागाईचा दर वाढला आहे. त्यामुळे संबंधित देशांच्या मध्यवर्ती बँकेंकडून व्याजदर वाढवण्यात आले आहे. कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत असल्याने महागाईचा भडका उडण्याचा धोका आहे.
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.