RBI Monetary Policy नवी दिल्ली:  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया थोड्याच वेळात पतधोरण जाहीर करणार आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास आणि पतधोरण समितीचे इतर सदस्य कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आरबीआयनं गेल्या 9 बैठकांमध्ये रेपो रेटमध्ये बदल केलेला नाही. 2023 पासून पतधोरणामध्ये व्याज दर 6.50 टक्के कायम आहे. यावेळी आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक  7 ऑक्टोबरला सुरु झाली असून आज पतधोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार आहेत.  


जाणकारांचा अंदाज काय?


आर्थिक वृत्तवाहिन्या आणि आर्थिक संस्थांचे अर्थशास्त्रज्ञ, तज्ज्ञांच्या मतांमध्ये वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत. काही जणांच्या मते आरबीआय व्याज दर 0.25-0.50 टक्के कमी करेल. तर काही जाणकारांच्या मते यावेळी देखील व्याज दर बदलणार नाही. तो कायम असेल.  


आरबीआयच्या निर्णयाचा जनतेवर परिणाम


आरबीआयनं व्याज दरात कोणताही बदल केला नाही तर बँकांकडून कर्जाचं व्याज कमी करण्याचं नाही. देशातील बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जांवरील व्याज दर कायम असतील. आरबीआयनं व्याज दर कमी केल्यास बँकांना देखील त्यांच्या कर्जांचे दर कमी करावे लागतात. त्यानंतर गृहकर्ज, वाहन कर्ज इत्यादी कर्जांचे व्याज दर कमी करावे लागतात. व्याज दर घटल्यास सणांच्या काळात फायदा होण्याची शक्यता आहे.  


जागतिक स्थितीचा निर्णयावर परिणाम


आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये  3.2 टक्के जागतिक विकास दराचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, सध्या विविध देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा परिणाम त्या अंदाजावर होऊ शकतो. इस्त्रालय विरुद्ध इराण यांचा संघर्ष सुरु आहे. रशिया यूक्रेन यांचा देखील संघर्ष सुरु आहे. या परिस्थितीच सामना करण्यासाठी जगभरातील बँकांना कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. 


भारताच्या जीडीपीमध्ये 2024 -25 च्या पहिल्या तिमाहीत 7.2 टक्के दिसून आली होती. विकसनशील देशांमधील ही चांगली वाढ होती. जागतिक विकास दरापेक्षा ती अधिक होती. अमेरिकेतली फेडरल रिझर्व्हनं त्यांच्या पतधोरणात 0.50 टक्के कपात केली होती. त्यानंतर जगभरात बँकांच्या पतधोरणात बदल दिसून आले. यूरोपियन सेंट्रल बँकेनं देखील व्याज दरात 0.25 टक्के कपात केली आहे. चीनच्या सेंट्रल बँकेनं अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी काही उपाययोजना सुरु केल्या आहेत, त्याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. 


जागतिक पातळीवर अस्थिरता असल्यानं आरबीआयच्या पतधोरणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. इराण -इस्त्रालय यांच्यातील युद्धामुळं अन्न पुरवठा यंत्रणा बिघडण्याची शक्यता आहे. काही देशांच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो. या सर्व गोष्टींचा विचार करता आणि महागाईचा विचार करता आरबीआय मोठा निर्णय घेऊ शकते. आरबीआय जागतिक अस्थिरता असून देखील रेपो रेटमध्ये कपात करु शकते किंवा सध्या असलेला दर कायम देखील ठेवू शकते.  


इतर बातम्या : 


ह्युंदाई ते स्विगी, चार मोठे आयपीओ येणार, पैसे कमवण्याची ही संधी अजिबात सोडू नका!