Repo Rate Hiked : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पुन्हा एकदा सर्वसामान्यांना झटका दिला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये (Repo Rate) 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा वाढ केली आहे. यानंतर रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6.50 टक्के झाला आहे. या दरवाढीमुळे ऑटो, गृह कर्जासह सर्व प्रकारची कर्ज महाग होतील. परिणामी ग्राहकांना जास्त ईएमआय भरावा लागेल. विशेष म्हणजे देशातील महागाई नियंत्रणात आल्यानंतरही आरबीआयने दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


रिझर्व्ह बँकेने आज (8 फेब्रुवारी) आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. यावेळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तीन दिवस आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची महत्त्वाची बैठक झाली. एमपीसीच्या सहापैकी चार सदस्यांनी रेपो रेट वाढवण्याच्या बाजूने कौल दिला. यानंतर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन या बैठकीची आणि त्यात घेतलेल्या निर्णयांची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. ज्यात रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंट्स म्हणजे 0.25 टक्के वाढ झाल्याने सर्वसामान्यांना पुन्हा धक्का बसला आहे.


रेपो रेटमधील वाढीचा कसा परिणाम होतो?


मे 2022 पासून रेपो रेटमध्ये आतापर्यंत  2.25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रेपो रेट मध्ये वाढ झाल्याने कर्जाचा हफ्ताही महागतो. यामुळे जर तुम्ही फ्लोटिंग रेटवर गृह कर्ज किंवा इतर कोणतंही कर्ज घेतलं असेल तर त्याचा ईएमआय वाढेल.  दुसरीकडे रेपो रेटमध्ये वाढ झाल्यांतर बँक एफडीसह इतर ठेवींवर अधिक व्याज देऊ शकतात म्हणजेच ठेवींचे दर वाढू शकतात.


रेपो रेट म्हणजे काय?


ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेते त्या दराला रेपो दर (Repo Rate) म्हणतात. रेपो दर वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे. तर, रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. याचाच अर्थ आरबीआयने रेपो दरात वाढ केली तर सामान्यांच्या कर्जात वाढ होते. 


रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? 


रिव्हर्स रेपो रेट (Reverse Repo Rate) म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व्ह बँकेकडे पैसा जमा करतात. त्यावर त्यांना मिळणाऱ्या व्याजाला रिर्व्हस रेपो दर म्हणतात. रेपो दर आणि रिव्हर्स व्याज दरात अर्धा ते एक टक्क्यांचा फरक असतो.