मुंबई : मणप्पुरम फायनान्स लिमिटेडला मोठा झटका बसला आहे. काही नियमांचं पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ने मणप्पुरम फायनान्सला 17.6 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. सोमवारी (18 एप्रिल) ही माहिती देताना रिझर्व्ह बँकेने सांगितलं की, केवायसी मार्गदर्शक तत्त्वांसह प्रीपेड रकमेच्या उत्पादनांशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे.


रिझर्व्ह बँकेने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. कंपनीचे उत्तर आणि सुनावणीची संधी दिल्यानंतर मध्यवर्ती बँकेने या निष्कर्षापर्यंत पोहोचली की, मणप्पुरम फायनान्सने आरबीआयच्या नियमांचे पालन न करण्यासंबंधीचे आरोप सिद्ध झाले आहेत आणि अशा परिस्थितीत आर्थिक दंड आकारणं आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "केवायसी आणि पीपीआयबाबत आरबीआयने जारी केलेल्या सूचनांचे पालन संस्था करत नसल्याचं दिसून आले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावून दंड का आकारु नये, अशी विचारणा करण्यात आली.


आरबीआयने म्हटलं आहे की, "पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स कायदा, 2007 च्या कलम 30 अंतर्गत आरबीआयला मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन हा दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आहे. कंपनीच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर मत व्यक्त करण्याचा हेतू नाही."


मणप्पुरम फायनान्स पुढील आर्थिक वर्षात 7,800 कोटी रुपये उभारणार 
मणप्पुरम फायनान्सने नुकतंच सांगितलं की त्यांच्या संचालक मंडळाने पुढील आर्थिक वर्षात 7,800 कोटी रुपये उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. यानुसार, नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरद्वारे 7,800 कोटी रुपये उभे केले जातील.


मणप्पुरम फायनान्स ही नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी आहे ज्याच्या देशभरातील सुमारे 25 राज्यांमध्ये शाखा आहेत. 1949 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीत 17,500 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. केरळमध्ये कंपनीचं मुख्यालय आहे. दरम्यान 2022 च्या सुरुवातीपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 26.62 टक्के घसरण झाली आहे. तर, गेल्या एका वर्षात त्यात 13.28 टक्क्यांनी घट झाली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या